Ashadhi Wari: ज्ञानेश्वर माऊली.., तुकाराम.., जयघोषात वारकरी दंग; तुकोबारायांच्या पालखीचा वळणदार रोटी घाट पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:46 PM2024-07-05T15:46:22+5:302024-07-05T15:49:01+5:30

Ashadhi Wari तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाच्या निनादामुळे अवघा परिसर दुमदुमला

in ashadhi wari sant tukaram maharaj palkhi crosses the winding Roti Ghat | Ashadhi Wari: ज्ञानेश्वर माऊली.., तुकाराम.., जयघोषात वारकरी दंग; तुकोबारायांच्या पालखीचा वळणदार रोटी घाट पार

Ashadhi Wari: ज्ञानेश्वर माऊली.., तुकाराम.., जयघोषात वारकरी दंग; तुकोबारायांच्या पालखीचा वळणदार रोटी घाट पार

पाटस : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) पाटस येथील विसाव्यानंतर ग्रामस्थांचा निरोप घेऊन पुढे पाटस-रोटी वळणदार घाटात पालखी मार्गस्थ झाली. साधारणता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालखीने दीड किलोमीटरचा चढतीचा घाट दोन तासात पार केला. (Ashadhi Wari)

यावेळी ज्ञानेश्वर माऊली.. तुकाराम.. हा जयघोष देण्यात वारकरी दंग झाले होते. तर, दुसरीकडे हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद यामुळे अवघा परिसर दुमदुमला होता. दिंडी सोहळा पाटस-रोटी घाट चढत असताना काही दिंड्यांतील वारकऱ्यांमध्ये धावण्याची जणू काही शर्यतच लागली होती. अशा रीतीने वारकरी भक्त खांद्यावर भगव्या पताका घेऊन घाटात धावत होते. महिला फुगड्या खेळण्यात दंग झाल्या होत्या तर दुसरीकडे घाटात पालखी मार्गावर नयनरम्य रांगोळ्या काढल्या होत्या. एकंदरीतच या वळणदार घाटात दिंडी सोहळा मार्गस्थ होताना उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी घाटाच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पुढे पालखी मजल-दरमजल करीत रोटी गावच्या शिवेवर गेल्यानंतर या ठिकाणी पालखीची आरती करण्यात आली.

वरवंड येथील मुक्कामानंतर पालखी मजल-दरमजल करीत पाटस येथे आली. यावेळी पाटसच्या सरपंच तृप्ती भडलकर, उपसरपंच राजवर्धन शितोळे आणि ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी येथील कलावंत अशोक गुजर यांनी पालखी मार्गावर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी पालखीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पाटस गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर, सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून अल्पोपहार देण्यात आला. साधारणता सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. याप्रसंगी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.

नैवेद्याची ४३ वर्षांची परंपरा

पाटसच्या श्रीराम मंदिरातील देशपांडे परिवाराकडून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीला ४३ वर्षांपासून नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात कमलाकर देशपांडे यांच्याकडे नैवेद्याची जबाबदारी होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे नैवेद्याची जबाबदारी असून, त्यानुसार देशपांडे कुटुंबीय पालखीच्या नैवेद्याचे मानकरी आहे.

पालखीचे चार नाथांच्या सान्निध्यातून मार्गक्रमण

जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन झाल्यानंतर यवतचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, भांडगावचे ग्रामदैवत श्री रोकडोबानाथ, बोरी पार्धीचे ग्रामदैवत श्री बोरमलनाथ, वरवंडचे ग्रामदैवत श्री गोपीनाथ या चार नाथांच्या सान्निध्यातून पालखी मार्गस्थ होत असते.

Web Title: in ashadhi wari sant tukaram maharaj palkhi crosses the winding Roti Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.