Maharashtra | औरंगाबादेत पारा उतरला १०च्या खाली, पुण्यातही गारठा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:00 AM2023-01-03T09:00:49+5:302023-01-03T09:02:31+5:30
राज्यात सर्वात कमी तापमान औरंगाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले...
पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे महाबळेश्वर पेक्षाही पुणे नाशिक, औरंगाबाद व जळगाव येथे कमी तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी तापमान औरंगाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, तर पुण्यात किमान तापमानाचा पारा १०.९ अंशांपर्यंत उतरला. पुढील पाच दिवस आकाश मुख्यत्वे निरभ्र राहणार असल्याने थंडी वाढेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने, उत्तरेकडील थंड वारे राज्यात पोहोचत आहेत. परिणामी, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात थंडी वाढली आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात अजून गारठा वाढलेला नाही. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्याअखेर थंडीत आणखी वाढ होईल. उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची लाटही येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, अन्य भागांत थंडीचा लाट येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात सोमवारी निचांकी तापमान औरंगाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर पुण्यात १०.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान : जळगाव १०, कोल्हापूर १८, महाबळेश्वर १४.२, नाशिक १०.२, सांगली १६.९, सातारा १४.५, सोलापूर १८.८, मुंबई १८.८, अलिबाग १४.५, रत्नागिरी १७.८, डहाणू १५.४, परभणी १४.६, नांदेड १६.८, अकोला १४.४, अमरावती १४.९, बुलढाणा १३.२, चंद्रपूर १६.३, गोंदिया ११.६, नागपूर १३.६, वाशिम १४.८, वर्धा १३.८, यवतमाळ १५.५.