बारामतीत चक्क खिल्लार गाईचे डोहाळे जेवण; पैठणी परिधान करून काढली मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:28 PM2022-10-10T19:28:58+5:302022-10-10T19:29:12+5:30
हौसा नावाच्या जातीवंत माणदेशी खिल्लार गायीचे डोहाळे जेवण व ओटीभरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला
माळेगांव : माळेगांवात एका कुटुंबाने खिल्लार गाईचे केलेले डोहाळे जेवण कौतुकाचा विषय ठरला आहे. हौसा असे या गाईचे नाव आहे. हौसा नावाच्या गाईचे डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते. अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती. बारामती तालुक्यातील माळेगांव येथे हा आगळावेगळा समारंभ पार पडला. हौसा नावाच्या जातीवंत माणदेशी खिल्लार गायीचे डोहाळे जेवण व ओटीभरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाद्वारे धंगेकर व राणे कुटुंबाने समाजासमोर आदर्श निर्माण केला.
योगिता व नानासाहेब राणे (ता. नातेपुते, जिल्हा सोलापूर )यांनी आपली मुलगी सोनियाच्या विवाह प्रसंगी धंगेकर कुटुंबास (रा.माळेगाव,तालुका बारामती ) जातीवंत खिल्लार गाईचे वासरु भेट दिले.या वासराची सोनिया व संग्राम धंगेकर,पती संग्राम,सासु मिना व सासरे सुर्यकांत धंगेकर (चोरमलेवस्ती कारखाना रोड माळेगांव) यांनी गाईची मुलीप्रमाणे जोपासना केली.तिचे हौसा असे नाव ठेवले.
नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते. अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच विविध पदार्थांचे रुखवत तयार केले होते.यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट दिली. तसेच परिसरातील अनेक विधवांना हळदीकुंकू लावून सुवासिनींचा मान दिला. यानंतर उपस्थित सर्वांना प्रितीभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.