बारामतीत नॉयलॉन मांजा गळ्याला कापल्याने एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 04:59 PM2022-08-06T16:59:11+5:302022-08-06T17:12:31+5:30
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी...
बारामती: शहरात नायलॉन मांजा गळ्याला कापल्याने एकास गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बारामती शहरात गेल्या आठवडाभरापासून शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री विरोधात कडक कारवाईची मोहिम राबविली. या कारवाईत चार जणांवर कारवाई करीत जवळपास ४० हजार रुपयांचा नायलॉन मांजा देखील जप्त केला. नायलॉन मांजा वापरुन पतंग उडविल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, नागपंचमी सण उलटून चार दिवस उलटले तरी अद्याप नायलॉन मांजाचा छुप्या पध्दतीने वापर सुरुच असल्याचे शुक्रवारी घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.
नितीन काका वणवे असे नायलॉन मांजा कापून जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. वणवे हे शुक्रवारी सायंकाळी आपले काम आटोपून दुचाकीवरुन घरी निघाले होते. यावेळी इंदापूर रस्त्याच्या मागील बाजूने ते निघाले असताना त्यांच्या गळ्याला नॉयलॉन मांजा कापला. तो मांजा धारदार असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. काही वेळातच त्यांना रक्तस्त्राव सुरु झाला. तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करीत रक्तस्त्राव थांबविला. यात वणवे यांच्या गळ्याला जवळपास २६ टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली नाही किंवा मुख्य नसांना धक्का लागला नाही.
याबाबत डॉ संजय पुरंदरे यांनी सांगितले की, नितीन वणवे यांना आतील व बाहेरील मिळून २६ टाके त्यांना टाकावे लागले. एखाद्याच्या जीवाशी आपण खेळतो आहोत याचे भान नॉयलॉन मांजा वापरणा-यांनी ठेवायला हवे. त्यांचे नशिब चांगले होते म्हणून स्वरयंत्र, तसेच इतर गंभीर दुखापत झाली नाही.