Baramati | बारामतीत ‘स्पीडगन’ ठेवणार भरधाव वाहनांवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:27 PM2022-12-01T14:27:49+5:302022-12-01T14:29:55+5:30
संबंधित मार्गावर आता ८० कि.मी प्रतितास वेगमर्यादा ठेवण्यात आली...
- प्रशांत ननवरे
बारामती (पुणे) :बारामतीत ‘स्पीडगन’भरधाव वाहनांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे विविध रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने आता वेसण घातली आहे. संबंधित मार्गावर आता ८० कि.मी प्रतितास वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्याच्यावर कारवाई केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बारामतीच्या विविध मार्गावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्पीडगन नजर ठेवणार आहे. बुधवारी (दि. ३०) ही स्पीडगन असणारे वाहन जेजुरी मार्गावर थांबविण्यात आले होते. जेजुरीचा ५० कि.मी. अंतराचा रस्ता चकाचक झाला आहे. या रस्त्यावर थर्मोप्लास्टने मध्यभागी व दोन्ही बाजूंना पट्टे आखण्यात आले आहेत व रस्त्यावर एकही खड्डा नाही. बारामती ते मोरगाव व मोरगाव ते जेजुरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा वाहतुकीसाठी हा रस्ता अधिक प्रशस्त झाला आहे. मात्र, या रस्त्यावर ताशी ८० कि.मी. प्रतितास याहून अधिक वेगाने जाणे आज चारचाकी वाहनचालकांना महागात पडले. आज ३५ जणांवर तब्बल दोन हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. आजपासून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली गेली. अनेक वाहनांचा वेग हा कमाल शंभर कि.मी. प्रतितास किंवा त्याहूनही अधिक होता. अनेक वाहनचालकांना त्यांच्या मोबाईलवर दंडाचे मेसेज आल्यानंतरच या कारवाईची माहिती समजली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी स्पीडगनद्वारे संबंधित भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जात असल्याचे सांगितले. स्पीडगन वाहनचालकाला माहिती न होता, त्याच्या वाहनाचा वेग टिपते. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा मेसेज पाठविला जातो. त्यानंतरच कारवाई झाल्याचे समजते. विविध रस्त्यांवर वेग मर्यादित राखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे स्पीडगन वाहन थांबणार आहे.त्यासाठी विशिष्ट दिवस ठरलेला नाही. वाहनचालकांनी ताशी ८० कि.मी. प्रतितास याहून अधिक वेगाने वाहन चालविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केसकर यांनी दिला आहे.