धक्कादायक! बारामतीत घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय; दोन पिडीत महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 05:24 PM2023-05-20T17:24:07+5:302023-05-20T17:26:05+5:30
या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
बारामती (पुणे) : बारामती शहरात हरिकृपानगर येथे चक्क एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय शहर पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज रोहिदास बेंद्रे व शांतिलाल शिवाजी बेंद्रे (रा. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली.
हरीकृपानगर या चांगल्या भागात एका अपार्टमेंटमधील सदनिकेत सुरू असलेल्या व्यावसायाची उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी निर्भया पथकासह त्यांच्याकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांना साध्या गणवेशात शहर पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना सूचना करत कारवाईचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार महाडिक यांच्यासह उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सपोनि प्रकाश वाघमारे, कर्मचारी अक्षय सिताफ, कल्याण खांडेकर, दशरथ जामदार आदींनी तेथे बोगस ग्राहक पाठवले. पंचांना पाचारण करण्यात आले. पाचशे रुपयांच्या तीन नोटा त्याच्याकडे देण्यात आल्या. बोगस ग्राहक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने आरोपींशी संपर्क साधला. त्यांनी वेश्यागमनासाठी महिला पुरविण्याचे मान्य केले. यावेळी बोगस ग्राहकाने पोलिसांना मिस काॅल करत इशारा केल्यानंतर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत बोंद्रे यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. घटनास्थळी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे ६९०० रुपये मिळून आले. तसेच तीस हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपींविरोधात अनैतिक मानवी व्यापार अधिनियम व भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.