Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:14 PM2022-04-07T19:14:17+5:302022-04-07T19:14:32+5:30
बुलेट, यामाहा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, एफझेडचा समावेश
बारामती : बारामती तालुका पोलिसांनी दुचाकीचोरांना दणका देत मोठी कारवाई केली. बुलेट, यामाहा, हिरोहोंडा,युनिकॉर्न, एफझेड यासारख्या महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये साडेआठ ते नऊ लाखांच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार तेजस सदाशिव कदम (रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या दुचाकी चोराला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी बुलेट, यामाहा, हिरोहोंडा,युनिकॉर्न, एफझेड यासारख्या पुणे व पिंपरी चिंचवड भागातून त्याने चोरलेल्या महागड्या दुचाकी मिळविल्या आहेत.
बारामती एमआयडीसी परिसरातील सुभद्रा मॉल, एमआयडीसी परिसर, महिला हॉस्पिटल या भागातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर पोलीसांनी अधिक गस्त वाढविली. दि. ६ रोजी अंमलदार राम कानगुडे, रणजित मुळीक, प्रशांत राऊत, अमोल नरुटे हे गस्त घालत होते. यावेळी सुभद्रा मॉलच्या पार्किंग परिसरात एक संशयिताचा वावर पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने या मॉल समोरून एक दुचाकी चोरल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यासंबंधीचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात २८ फेब्रुवारी रोजी दाखल होता. अधिक चौकशीत त्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून अनेक महागड्या दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.