सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:53 PM2022-02-17T14:53:17+5:302022-02-17T15:00:14+5:30
सासरच्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
पिंपरी : सासरच्यांकडून विवाहितेला मारहाण केली जात असताना भांडण सोडविण्यासाठी विवाहितेचे वडील गेले. त्यावेळी सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू झाला. जय मल्हार नगर, थेरगाव येथे बुधवारी (दि. १६) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
शिवाजी बाबुराव पाडुळे (वय ६५, रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव), असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आजिनाथ आप्पा धर्मे, सुमन आप्पा धर्मे, रंजना बाळासाहेब पाडुळे, संपत बाळासाहेब पाडुळे, मंगेश बाळासाहेब पाडुळे, रेश्मा संपत पाडुळे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी आजिनाथ, सुमन, रंजना आणि मंगेश या चौघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहीण रतन धर्मे यांना लग्न झाल्यापासून आरोपी आजिनाथ आणि सुमन यांनी किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीला मारहाण केली. सुमन धर्मे हिने लोखंडी रॉड डोक्यात मारला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे आई-वडील गेले. फिर्यादीच्या वडिलांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्याचे माहिती असूनही आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झाला. याबाबत सहा जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.