भीमाशंकर मंदिरात तोकडे व अशोभनीय कपडे चालणार नाहीत; देवस्थानचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 12:38 PM2024-03-17T12:38:30+5:302024-03-17T13:35:55+5:30
भीमाशंकर मंदिर परिसरात वस्त्र संहितेच्या सूचना असलेले फलक लावण्यात आले असून लोकांनी याचे काटेकोर पालन करावे
भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकरमंदिरात प्रवेश करताना आता तोकडे व अशोभनीय कपडे चालणार नाहीत. मंदिरात प्रवेशसाठी देवस्थाने वस्त्र सहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी सांगितले. महाराष्ट्र मंदिर महासंघाने ओझर ता.जुन्नर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 71 मंदिर संस्थांनी आपल्या मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भीमाशंकर देवस्थान बरोबर कसबा गणपती सह पुणे शहरातील व पुणे ग्रामीण भागातील मंदिरांचा समावेश आहे. वस्त्र संहिता लागू करून कोणावरही बंधने टाकण्याचा उद्देश नसून मंदिरात येताना भाविकांचे आपल्या संस्कृतीनुसार कपडे असावेत जसे की आपण पूजाअर्चा करताना धोतर नेसून महिला साडी घालून पूजा करतात त्याचप्रमाणे मंदिरात येताना तोकडे अपुरे कपडे नसावेत सलवार कृत्यासारखे अंग झाकून असणारे कपडे असावेत हा उद्देश आहे. अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत दक्षिण भारतात लुंगी गुंडाळून मंदिरात जावे लागते घृष्णेश्वर मंदिरात अंगावरचा शर्ट काढून मंदिरात जावे लागते. याचा प्रमुख उद्देश फक्त मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आहे तरी लोकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मधुकरशास्त्री गवांदे यांनी केले आहे.
भीमाशंकर मंदिर परिसरात वस्त्र संहितेच्या सूचना असलेले फलक लावण्यात आले आहेत. लोकांनी याचे काटेकोर पालन करावे. जरी कोणाच्या अंगावर असे तोकडे कपडे असतील तरी त्याला कोणी अडवणार नाही मात्र आपल्या संस्कृतीचे व सूचनांचे लोकांनी पालन करावे असे आवाहन भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी केले आहे.