इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 06:29 PM2024-05-31T18:29:37+5:302024-05-31T18:30:28+5:30
पाच-सहा दिवसांत पाणी देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून, त्यास मंजूरी मिळाल्यावर पाणी सोडले जाईल असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले
कळस: इंदापूर तालुक्याला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्याचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी कालवा संघर्ष समितीच्या माध्यमातून डाळज क्र. २ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनीपाणी सोडण्याचे आश्वासन आताच द्या अशी मागणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कार्यकारी अभियंत्यांच्या पाणी सोडण्याच्या आश्वासनाशिवाय रस्त्यावरुन उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. आंदोलनकर्ते संतप्त भावना व्यक्त करत रणरणत्या उन्हात डांबरी रस्त्यावर बसले. हे आंदोलन सुमारे दोन तास सुरु होते. सकाळी ११ वाजता खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील कळस, रुई, न्हावी, निरगुडे, भादलवाडी, अकोले गावातील शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. सुरवातीला समितीच्या सदस्यांची भाषणे झाली. यामध्ये खडकवासला कालव्याच्या पाण्याबाबत वारंवार इंदापूर तालुक्यावर अन्याय केला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पुण्याची वाढती पाण्याची मागणी विचारात घेवून, त्यांनी वापरलेले १० टीएमसी पाणी प्रक्रिया करुन इंदापूरातील सिंचनाला उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
कार्यकारी अभियंत्या श्वेता कुऱ्हाडे आंदोलनस्थळी येऊन इंदापूरला पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून, त्यास मंजूरी मिळाल्यावर पाणी सोडले जाईल असे स्पष्टीकरण दिले. मात्र आंदोलनकर्त्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन आताच द्या अशी मागणी करत त्यांना धारेवर धरले. इंदापूरला पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाची सकारात्मक भूमिका आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्यास मंजूरी मिळाल्याशिवाय पाणी सोडता येणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दौंडला सोडण्यात आलेले पाणी हे कालवा सल्लागार समितीच्या पूर्वनियोजन पाणी वाटपाच्या निर्णयानुसार सुरू आहे. यामुळे इंदापूरला पाणी देण्याच्या मंजुरीशिवाय पाणी देता येणार नाही. पाच-सहा दिवसांत पाणी देण्याबाबत सकारात्मक असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.