१२१ भारतीय भाषांमध्ये, १२१ गाण्यांचे सलग साडे तेरा तास सादरीकरण; मंजुश्री ओक यांचा अनोखा विक्रम
By श्रीकिशन काळे | Published: June 1, 2023 01:08 PM2023-06-01T13:08:15+5:302023-06-01T13:09:43+5:30
देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने केलेला प्रयत्न यशस्वी ठरला
पुणे: विविधतेत एकता या सूत्राने आपला देश बांधला गेला आहे. याच एकात्मकतेचे दर्शन पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक यांनी ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ आपल्या नावावर करत घडवून आणले आहे. भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण करीत ओक यांनी जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. गुरुवार दि. १० ऑक्टोबर, २०१९ रोजी सदर विक्रमासाठी त्यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमात प्रयत्न केला होता. नुकतेच गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांकडून हा विक्रम पूर्ण झाल्याचे त्यांना नुकतेच कळविण्यात आले आहे. या आधी ओक यांनी २०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्डस्’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये देखील प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत.
याबद्दल माहिती देताना मंजुश्री ओक म्हणाल्या, “लहानपणापासून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना आपल्या संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काहीतरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने प्रयत्न करीत असताना श्री यशलक्ष्मी आर्ट तर्फे आणि पद्मनाभ ठकार यांच्या विशेष सहकार्याने पुण्यात ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला. वीस मैलांवर जशी भाषा बदलते तशीच भारताचा विचार केल्यास भाषेमधील वैविध्य प्रकर्षाने समोर आले. आज भारतात १८०० हून अधिक भाषा, बोलीभाषा, उपभाषा बोलल्या जातात. विशेष म्हणजे या सर्व भाषांवर त्या त्या भागांतील संस्कृती, संगीत, परंपरा, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती यांचा ठळकपणे प्रभाव दिसून येतो. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला.”
२०१९ हे वर्षे युनोच्या वतीने ‘स्वदेशी भाषा वर्ष’ म्हणून जाहीर झाले असताना या प्रयत्नाने अनेकांपर्यंत पोहोचता आले आणि भारतीय भाषांची समृद्धी जगासमोर मांडता आली याचा अभिमान आहे. भाषा निवडताना जनगणना कार्यालयाच्या अहवालांचा विशेष उपयोग झाला. शिवाय प्रत्येक भाषेप्रमाणे गीताच्या चाली, बोल, लहेजा यांवर देखील काम करता आले. यामधील काही गाणी ही कवितेच्या स्वरूपात होती त्याला संगीत देत, उच्चार लक्षात घेत, भाव लक्षात घेत त्याचे सादरीकरण हे मोठे आव्हान होते. या १२१ भाषांमध्ये उत्तर व दक्षिण भारतातील सर्व प्रमुख भाषांबरोबरच ईशान्य भारतातील बोलीभाषा, निकोबारी भाषा, हिंदीची उपभाषा असलेली भोजपुरी या भाषांचा देखील समावेश आहे. तर गाण्यांमध्ये पारंपारिक गीते, लोकगीते, भक्तीगीते, भावगीते, अभंग, देशभक्तीपर गीते, लावणी अशा विविध गाण्यांच्या प्रकारांचा समावेश केल्याचे ओक यांनी आवर्जून सांगितले.
मंजुश्री ओक यांनी एसएनडीटी महाविद्यालय येथून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असून त्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती प्राप्त आहे. आपले वडील वसंत ओक यांकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरविले नंतर पद्मश्री पं ह्दयनाथ मंगेशकर यांकडे त्या गाणे शिकल्या आहेत. आकाशवाणीच्या ग्रेडेड कलाकार असलेल्या ओक यांनी आजवर संगीताचे अनेक कार्यक्रम तर केले आहेतच शिवाय गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् सोबत २०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्डस्’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ असे प्रत्यकी २ रेकॉर्डस् स्वत:च्या नावावर करीत त्यांनी विक्रम नोंदविले आहेत. अशा पद्धतीने रेकॉर्डस् करणाऱ्या त्या एकमेव आशियाई गायिका आहेत. शिवाय स्वदेशी भाषांमध्ये असे रेकॉर्ड केलेल्या जगातील एकमेव व्यक्ती आहेत.