Vidhansabha By-Election | कसबा, चिंचवड मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:06 PM2023-02-14T12:06:06+5:302023-02-14T12:07:01+5:30
पाेटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे :कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २६ फेब्रुवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. त्याचबराेबर मतमोजणीच्या दिवशी (दि. २ मार्च) प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदारसंघातील सर्व किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
देशमुख यांनी या कालावधीत मतदारसंघात सर्व किरकोळ मद्यविक्रीचे परवाने न देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कार्यक्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बीअर, वाईन उत्पादन करणाऱ्या परवानाधारक कंपन्या आपली उत्पादन निर्मितीची प्रक्रिया बंदच्या कालावधीत सुरू ठेवू शकतील. मात्र, त्यांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक निरीक्षकांची मतदान केंद्रांना भेट
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांनी या मतदारसंघातील महात्मा फुले पेठ येथील कै. केशवराव जेधे मनपा शाळा क्र. १६, भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला आणि शुक्रवार पेठ येथील आदर्श विद्यालय या मतदान केंद्रांना भेट देऊन केंद्रांची तपासणी केली.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायकांना निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश कला-क्रीडा स्वारगेट येथे रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी कसबा पेठ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ, तहसीलदार शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
मतदान यंत्रांची तपासणी
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात ७०० मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी सोमवारी पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे, तहसीलदार प्रशांत पिसाळ तसेच बेल कंपनीचे अभियंते उपस्थित होते.