Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये भाजपला धक्का द्यायचा म्हणजे शिवसेना अन् मनसेला फार जोर लावावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:00 PM2024-10-30T18:00:25+5:302024-10-30T18:00:59+5:30
कोथरुडकरांच्या हातातून कमळ बाजूला काढण्याचे दोघांसमोरही उभे आव्हान
पुणे : कोथरूड विधानसभा मतदार संघ २००९ साली प्रस्थापित झाला. तेव्हापासून याठिकाणी भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. सद्यस्थितीत हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. पण आगामी निवडणुकीत मनसेच्या एन्ट्रीने मतांचं गणित बदलण्याची शक्यता आहे. परंतु भाजपचं इथं प्रचंड मताधिक्य असल्याने शिवसेना आणि मनसेला जोरदार प्रचार करावा लागणार आहे. तसेच कोथरुडकरांच्या हातातून कमळ काढण्याचे आव्हानच दोघांसमोर उभे आहे.
कोथरूड हाय प्रोफाईल असा मतदारसंघ आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील इथे महायुतीचे उमेदवार आहेत. पक्षाचे दोन खासदार इथे मतदार आहेत. त्यातील एक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, दुसऱ्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी आहेत. पक्षाचे अनेक नगरसेवक आहेत. दुसरीकडे १० वर्षांपूर्वी या मतदारसंघाचा आमदार असलेले चंद्रकांत मोकाटे (उद्धवसेना) महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. त्याशिवाय २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार होऊन तब्बल ८० हजार मते मिळवणारे किशोर शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवार आहेतच. त्यामुळे हा सामना तिरंगी होणार आहे. त्यात शिंदे यांनी पुन्हा तेवढीच मते घेतली तर मोकाटे अडचणीत, नाही घेतली तर पाटील अडचणीत व दोघांमध्ये मतांची मोठी विभागणी झाली तर पाटील फायद्यात असे सध्याचे चित्र आहे. आजतरी ते पाटील यांच्या फायद्याचे आहेत. त्याचे रंग मतदान होईपर्यंत बिघडणार नाही याची काळजी ते घेतीलच. कोथरूड हा शिवसेनेचा (एकत्रित) बालेकिल्ला होता. आता फूट पडली आहे. १० वर्षांपूर्वी ताकद होती, पण मधल्या काळात कितीतरी राजकीय बदल झाले. भाजपचा हा नुसता बालेकिल्लाच नाही तर पुण्यातील राजधानी झाली आहे. त्याला धक्का द्यायचा म्हणजे शिवसेनेला किंवा मनसेलाही फार जोर लावावा लागेल असे दिसते.
चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा
पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत असताना अमोल बालवडकर यांनी भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून आले होते. पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा दिला होता. अखेर त्यांनी बंडखोरीचा निर्णय मागे घेतल्याने चंद्रकांत पाटलांचा रस्ता सध्या तरी मोकळा झाला आहे.