मावळ, शिरूर मतदार संघांत स्थानिक नेत्यांसह कार्यकर्तेही ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 01:59 PM2024-03-21T13:59:27+5:302024-03-21T14:01:01+5:30
निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे स्थानिक नेते सध्या तरी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत....
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निश्चित झाल्याची नुसतीच चर्चा आहे. मात्र, त्यांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे स्थानिक नेते सध्या तरी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत.
मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघांतील महाआघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी पक्की समजून प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र, महायुतीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीवरून रस्सीखेच झाली. त्यामुळे अंतिमतः निवडणुकीच्या रिंगणात कोण राहणार, हे पुढे आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
राष्ट्रवादी शिवसेनेचे काम करणार का?
शिरूर मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, तेथे राष्ट्रवादीकडे उमेदवार नसल्याने शिवाजीराव आढळराव-पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी माफी मागितली तरच आम्ही महायुतीचा धर्म पाळू, अशी भूमिका शहर राष्ट्रवादीने घेतली आहे. भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र शांत आहेत.
मावळात मनोमिलन?
मावळ मतदारसंघात भाजपला उमेदवारी देण्यात यावी, यासाठी स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, त्यांचे मनोमिलन घडवून आणण्यात भाजप-शिंदे गटातील वरिष्ठांना यश मिळाल्याने ते बंड शांत झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. मात्र, वरिष्ठांचा आदेश आल्यावर महायुतीचा धर्म पाळणार असल्याचेही राष्ट्रवादीचे नेते खासगीत सांगत आहेत. त्यामुळे तेही ‘वेट ॲण्ड वॉच’च्याच भूमिकेत आहेत.