Summer | उन्हाचा चटका! पुणेकरांना भाजून काढतोय एप्रिल महिना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:54 AM2022-04-27T11:54:55+5:302022-04-27T11:59:02+5:30
पाषाण, लोहगाव येथील कमाल तापमान नेहमीच ४० अंशांचे वर राहात आले आहे...
पुणे : यंदाचा उन्हाळा तीव्र असेल असा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असल्याचा अनुभव यंदा पुणेकरांना चांगला येत आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात एक-दोन दिवस पारा ४० अंशाच्या वर जात असे. मात्र, यंदा प्रथम तिसऱ्यांदा तापमानाचा पारा ४०च्या वर गेला आहे. त्याचवेळी ३९ अंशाहून अधिक तापमान राहणाऱ्यांचे दिवसही वाढले आहेत. मंगळवारी कमाल तापमानाने पुन्हा एकदा चाळिशी ओलांडली. शिवाजीनगर येथे ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. पाषाण, लोहगाव येथील कमाल तापमान नेहमीच ४० अंशांचे वर राहात आले आहे.
गेले काही दिवस उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. दुपारपासूनच अंगाची लाहीलाही होईल असे ऊन जाणवत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूकही रोडावलेली असते. चौकातील सिग्नलला थांबले तरी तितक्या वेळेत अंगाला चटका बसल्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी रात्रीच्या तापमानातही गेले काही दिवस मोठी वाढ झाली होती. त्यामुळे उकाडा आणखीनच जाणवत होता.
यंदा शहरात एप्रिल महिन्यात ७ व ८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. आज मंगळवारी पुन्हा ४०.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी ३९ अंशापेक्षा अधिक तापमान किमान १० दिवस होते. त्यामुळे गेल्या काही वर्षातील सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना ठरला आहे.
यापूर्वी गेल्यावर्षी ६ एप्रिल २०२१ रोजी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. तर, १७ एप्रिल २०२० रोजी ४०.१ अंश सेल्सिअस हे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती.
गेल्या १० वर्षातील सर्वाधिक तापमान असलेला एप्रिल महिन्यातील दिवस
६ एप्रिल २०२१ ३९.६
१७ एप्रिल २०२० ४०.१
२९ एप्रिल २०१९ ४३
२९ एप्रिल २०१८ ४०.४
१९ एप्रिल २०१७ ४०.८
२८ एप्रिल २०१६ ४०.९
२८ एप्रिल २०१५ ४०.०
३० एप्रिल २०१४ ४०.६
३० एप्रिल २०१३ ४१.३
९ एप्रिल २०१२ ३९.९
३० एप्रिल १८९७ ४३.३
आणखी दोन दिवस उष्ण राहणार
शहरात आणखी दोन दिवस कमाल तापमान ४० अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तसेच रात्रीचे तापमान २३ अंशाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पुढील तीन दिवस कमाल तापमान ३९च्या आसपास राहणार असून, २ मे रोजी पारा पुन्हा चाळिशी ओलांडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.