नारायणपूरात उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान, दत्त जयंती सोहळ्याचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 08:04 PM2023-12-26T20:04:28+5:302023-12-26T20:04:52+5:30

तसेच चंद्रभागा कुंडाचे पूजन होऊन त्यानंतर उत्सवमूर्ती व पादुकांना विधीनुसार स्नान घालण्यात आले. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष करण्यात आला...

In Narayanpur, Utsavamurti and Padukas are bathed in Chandrabhaga, Dutt Jayanti celebrations conclude. | नारायणपूरात उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान, दत्त जयंती सोहळ्याचा समारोप

नारायणपूरात उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान, दत्त जयंती सोहळ्याचा समारोप

सासवड (पुणे) : श्री क्षेत्र नारायणपूर येथे २४ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या दत्त जयंती सोहळ्याचे तिसऱ्या दिवशी प.पू. नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व पोपट महाराज स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा झाली. तसेच चंद्रभागा कुंडाचे पूजन होऊन त्यानंतर उत्सवमूर्ती व पादुकांना विधीनुसार स्नान घालण्यात आले. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष करण्यात आला.

दत्त जयंती सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता मंदिरात आरती होऊन उत्सवमूर्ती व पादुकांना फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आले. त्यानंतर मंदिरातून पालखीने ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले. पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी तुतारी व दिगंबराच्या गजराने सारा परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत पालखीपुढे छबिना, ढोल-लेजीम पथक, बँड पथक, भजन पथक आदींचा यात समावेश होता. तसेच पताका, अबदागिरी समवेत भगव्या वेशातील सेवेकऱ्यांमुळे सारा परिसर भगवामय झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या प्रसंगी मंदिर व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर, भारूडकार लक्ष्मण राजगुरू, रामभाऊ बोरकर, अजित बोरकर, सरपंच प्रदीप बोरकर, ग्रामसेवक रोहित अभंग, चंद्रकांत बोरकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, दादा भुजबळ आदी सहभागी झाले होते.

मिरवणूक ११ वाजता चंद्रभागा कुंडावर आल्यावर तेथे फुलांनी सजविलेल्या ओट्यावर पालखी विसावली. पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेले पाणी चंद्रभागा कुंडात सोडून त्यानंतर फुले, पुष्पहार, ओटी, फळे अर्पण करण्यात येऊन त्याची पूजा करण्यात आली. यावेळी पूजेसाठी विजय सूर्यवंशी - कोलकाता, दीपक पाटील - कन्याकुमारी, विजय पुरंदरे, आप्पासो जगताप, तात्या भिंताडे, गणेश सोनवणे, प्रकाश बाफना, श्रीनाथ बोरकर, एम. के. गायकवाड, महादेव जाधव, मारुती सस्ते यांना मान मिळाला. उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागास्नान घातल्यानंतर यांचे विधीनुसार पूजन करण्यात येऊन पुन्हा उत्सवमूर्ती व पादुकांना पालखीत ठेवण्यात आले. पालखी वाजतगाजत मंदिरात आली. मंदिरात प्रवचन होऊन आरती झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

Web Title: In Narayanpur, Utsavamurti and Padukas are bathed in Chandrabhaga, Dutt Jayanti celebrations conclude.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.