Corona Update| पिंपरी-चिंचवडमध्ये एका आठवड्यात ५१४ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 01:47 PM2022-08-15T13:47:59+5:302022-08-15T13:48:29+5:30
७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत ५१४ रुग्णांची नोंद...
पिंपरी : पावसाळा सुरू असल्याने शहरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. परंतु, या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत ५१४ रुग्णांची नोंद झाली. तर, ७८३ जण बरे झाले आहेत. सध्या साथीचे आजार वाढल्याने कोरोनाच्या तपासण्या करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. आठवड्यात ५१५२ जणांनी टेस्ट केली. शहरात सध्यस्थितीत ५१४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ४८४ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. रुग्णालयात ३० रुग्ण दाखल आहेत.
जून आणि महिन्यात राज्यात रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यावेळी शहरात देखील रुग्णसंख्या वाढली होती. तेव्हा दिवसाला सरासरी १५० ते २०० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. रुग्ण वाढ लक्षात घेता. त्यावेळी खबरदारी म्हणून आकुर्डी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील १० खाटा राखीव ठेवला होता. तर ४० खाटांचे कक्ष सुरू करण्यात आले होते. परंतु शहरातील रुग्णसंख्या काही दिवसांतच कमी झाली.
सध्यस्थितीत आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वच रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. परिणामी, बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण सध्या तरी कमी आहे. तसचे मागील अनेक दिवसांपासून शहरात कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
आकडेवारी ( ७ ते १३ ऑगस्ट )
तारीख, रुग्ण, बरे झालेले , टेस्ट
७ ऑगस्ट, ८०, १३९, १०४३
८ ऑगस्ट, ४१, ५४, ६४५
९ ऑगस्ट, ११२, १४३, ७७३
१० ऑगस्ट, ६१, ११३, ७०५
११ ऑगस्ट, ८८, ८६, ७१०,
१२ ऑगस्ट, ५५, ११८, ३४९
१३ ऑगस्ट, ७७, १३०, ९२७,
लस घेणाऱ्यांची संख्या वाढली
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त १४ आणि १५ ऑगस्टला लसीकरण सुरू राहणार आहे. पूर्वी बूस्टर डोस घेण्याला कमी प्रतिसाद मिळत होता. परंतु मोफत डोस देणे सुरू केल्यामुळे महापालिकेच्या सर्वच केंद्रांवर लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्यस्थितीत आठ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर कोबॉक्स, कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लसीचे ३०० डोस देण्यात येत आहे.