पिंपरी चिंचवड शहरात ऑक्टोबर हिटने घामाच्या धारा, बदलत्या हवामानाने रुग्णांमध्येही वाढ
By प्रकाश गायकर | Published: October 9, 2023 01:00 PM2023-10-09T13:00:13+5:302023-10-09T13:00:51+5:30
परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे....
पिंपरी : महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या वाटेवर असून पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून ‘ऑक्टोबर हिट’चा चटका जाणवत आहे. दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. तर दिवसभर नागरिक घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघत आहे. परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर, हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारचे तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चांगलाच चटका बसत असून ‘ऑक्टोबर हिट’ जाणवत असल्याने दुपारी बाहेर फिरताना घाम फुटत आहे. शहरात रविवारी (दि. ९) दुपारचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दुपारी कडक ऊन, रात्रीही हवेमध्ये उष्णता जाणवत आहे. मात्र, पहाटे अंगाला झोंबणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दिवसभर घामाच्या धारा वाहत असल्या तरी पहाटे थंडी वाजत आहे. या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. शहरात थंडी-ताप व व्हायरल आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
अचानक हवामानामध्ये बदल झाला आहे. ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. त्यामुळे बदलेल्या वातावरणामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी. शरिराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, फळांचे सेवन करावे. तसेच योग्य आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.