पिंपरी-चिंचवडमध्ये ‘इनकमिंग’मुळे शरद पवार गटाच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता? शहराध्यक्ष बदलीचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:59 PM2024-07-05T14:59:28+5:302024-07-05T14:59:50+5:30

या ‘इनकमिंग’मुळे पक्षाच्या वाईट काळात बरोबर असणाऱ्या निष्ठावंतांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे...

In Pimpri-Chinchwad due to 'incoming' unrest among Sharad Pawar group loyalists? | पिंपरी-चिंचवडमध्ये ‘इनकमिंग’मुळे शरद पवार गटाच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता? शहराध्यक्ष बदलीचीही चर्चा

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘इनकमिंग’मुळे शरद पवार गटाच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता? शहराध्यक्ष बदलीचीही चर्चा

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. १५ ते २० माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या ‘इनकमिंग’मुळे पक्षाच्या वाईट काळात बरोबर असणाऱ्या निष्ठावंतांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता. मात्र, जुलै २०२३ मध्ये पवारच शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले. पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. आता इनकमिंग सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे युवकचे प्रदेश पदाधिकारी विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभाेर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

पत्ता कट होण्याची निष्ठावंतांना भीती

पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात लक्ष घातले. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. तर बडे नगरसेवक आले तर आपला महापालिका निवडणुकीत पत्ता कट होईल, या भीतीने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

अजित पवार यांना घेरण्याची रणनीती

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे विद्यमान अध्यक्ष अजित गव्हाणे हे देखील आहेत. गव्हाणे जर शरद पवार गटात आले तर अनेक पदाधिकाऱ्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. बारामतीनंतर अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये घेरण्याची रणनीती पवार गटाने आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ज्युनिअर पवारांची मर्जी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांनीही शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्यांच्यावर रोहित पवारांची मर्जी असेल, त्यालाच पदे दिली जातील. यामुळे रोहित पवारांशी जवळीक कशी साधता येईल, याची चाचपणी काही पदाधिकारी करत आहेत.

Web Title: In Pimpri-Chinchwad due to 'incoming' unrest among Sharad Pawar group loyalists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.