पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी ४१ जणांची रस्त्यावरच उतरवली !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:17 PM2023-01-02T12:17:19+5:302023-01-02T12:19:08+5:30
संशयित १५७५ वाहनांची तपासणी...
पिंपरी : शहरातील शौकिनांनी पार्टीमध्ये जल्लोष करून नववर्षाचे स्वागत केले. यातील काही जणांनी मद्यपान करून वाहन चालविले तसेच काही जणांनी हुल्लडबाजी केली. अशा बेशिस्तांवर तसेच मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे अनेकांची रस्त्यावरच उतरली. तर काही जणांनी पोलिसांची नाकाबंदी पाहून मार्ग बदलला.
‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी ४१ जणांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शनिवारी (दि. ३१) सायंकाळपासूनच पोलिस रस्त्यावर उतरले होते. यात मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यपान केल्याचा संशय आल्यास तपासणी करण्यात येत होती. अशा ४१ मद्यपी वाहनचालकांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शनिवारी कारवाई केली.
संशयित १५७५ वाहनांची तपासणी
नववर्षाच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर मोठी वर्दळ होती. यात संशयित असलेल्या १५७५ वाहनांची तपासणी पोलिसांनी केली. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
‘त्या’ २४९ जणांची तंतरली
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी काही संशयित वाहनचालकांवरही पोलिसांचा ‘वाॅच’ होता. यात २४९ संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. पोलिसांकडून कसून चौकशी होत असल्याने या संशयितांची तंतरली होती.
८५ वाहनांवर कारवाई
संशयित वाहनांची कसून तपासणी करून पोलिसांनी काही वाहनांवर कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, सीटबेल्टचा वापर न करणे अशा विविध कारवाई यात केल्या. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८० वाहनांवर कारवाई झाली. तर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा वाहनांवर पाच खटले दाखल करण्यात आले. अशा एकूण ८५ कारवाई केल्या.
दंडात्मक ३७ कारवाई
बेदरकारपणे भरधाव वाहन चालविण्याचे काही प्रकार घडले. तसेच इतरांना धोका होईल असे वाहन चालवणाऱ्यांनाही पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवला. अशांवर १८४ नुसार ३७ दंडात्मक कारवाई करण्यात आली.