'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 03:10 PM2024-05-07T15:10:49+5:302024-05-07T15:19:49+5:30
लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडले परंतु नावे, फोटो चुकीचे असल्याने निराश होऊन परतावे लागले
धनकवडी : लोकसभा निवडणुकीचा राज्यातील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये बारामती सह एकूण अकरा हायव्होल्टेज लढतींचा समावेश असून मंगळवारी सकाळी सात वाजता शांततेत मतदानाला सुरुवात झाली, मात्र नवं नंतर मोठ्या संख्येने मतदार घरा बाहेर पडले, अकरा नंतर रखरखत्या ऊन्हात ऐन मतदाना दिवशी मतदान केंद्राची शोधा शोध करताना मतदारांची चांगलीच दमछाक झाली. धनकवडीतील अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील गोंधळामुळे जवळपास पंधरा हजार मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला तर अनेक मतदारांच्या नाराजीचा सामना प्रशासनाला करावा लागला
दरवर्षी मतदान करणारे मतदार नेहमी प्रमाणे मतदान केंद्रावर गेले मात्र मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा अधिकार बजावता न आल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बरेच जणांची नावे इतर ठिकाणी वर्ग झाली आहेत तर अनेकांची नावे मतदार यादीत आहेत मात्र फोटो डिलीट मारला असल्या मुळे मतदाना पासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मतदान प्रक्रियेत सहभागी होणा-या मतदारांचीही नावे यादीत नसल्याने त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.
या घोळासाठी निवडणूक आयोग, कर्मचा-यांना दोषी धरावे का? कि या पाठीमागे कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांनी लोकमत शी बोलताना उपस्थित केला. यादीतून नाव वगळणे याबाबत कर्मचा-यांचा चुका ग्राह्य धरल्या तरीही नागरिकांनी नावाची तपासणी का केली नाही? या मुद्दय़ा पासून ते मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी जनजागृती फक्त नवा पुरतीच होती का? कसा हि प्रश्न उपस्थित केला.
सुनील राजाराम जाधव म्हणाले, मी मागील वीस वर्षांपासून धनकवडीत राहात असून दर पंचवार्षिक निवडणुकीत मतदान करत आहे. आज नवमहाराष्ट्र शाळेत मतदान करण्यासाठी आलो होतो, लाईन मध्ये उभे राहून मतदान करण्यासाठी आत मध्ये गेलो तर माझ्या फोटोच्या जागेवर दुसर्याचा फोटो होता, आणि माझ्या जागेवर मतदान झाल्याचे मला सांगितले.
बबनराव कृष्णा जाधव प्रियदर्शिनी विद्यामंदिर धनकवडी शाळेत मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना हि असाच अनुभव आला. तर शारदा सुरेश जगताप नवमहाराष्ट्र शाळेत मतदान करण्यासाठी लाईन मध्ये उभ्या राहिल्या. मात्र त्यांचे नावच मतदार यादी मध्ये नव्हते. अशा एक ना अनेक तक्रारी आणि त्यासाठी प्रशासन आणि मतदार यांच्या मध्ये शाब्दिक चकमक उडू लागल्या.