पुण्यात सराईत गुन्हेगाराची एवढी मजल! रात्रगस्तीवरील पोलीस अधिकाऱ्यावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:39 AM2022-12-16T10:39:41+5:302022-12-16T10:42:27+5:30
रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे...
पुणे/किरण शिंदे : मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पान शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आली. पुण्यातील वारजे परिसरातील गणपती माथा परिसरात 15 डिसेंबरच्या पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 10 जणांच्या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पोलिसाच्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
दिग्विजय ककाराम वाघमारे (वय 19), व्यंकटेश प्रमोद पिळवणकर (वय 19), अमोल निलेश पवार, लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे यांच्यासह आणखी तीन ते चार इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी दिग्विजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गोविंद भारत फड (वय 39) या पोलीस कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हे फिर्यादी यांच्यासोबत कोथरूड विभागात रात्रगस्तीवर होते. यावेळी त्यांना गणपती माथा येथील रॉयल पान शॉप समोर गर्दी दिसल्याने पान शॉप बंद करण्यासाठी आणि गर्दी हटवण्यासाठी ते थांबले होते. गर्दीत असलेल्या आरोपींनी जमाव करून फिर्यादी यांच्या दिशेने दगडफेक करत सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या गल्लीत ते पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.