पुण्यात लिंबू सरबत विक्रेत्याचा दिवसभराचा गल्ला हत्याराचा धाक दाखवून लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:21 PM2022-12-06T12:21:55+5:302022-12-06T12:25:34+5:30
खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला...
पुणे / किरण शिंदे : लोखंडी हत्याराचा धाक दाखवून लिंबू सरबत विक्रेत्याला लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवसभर हातगाडीवर लिंबू सरबत विक्री करून जमा झालेले पैसे घेऊन हा विक्रेता घरी जात असताना हा प्रकार घडला. टोळक्याने या विक्रेत्याला मारहाण करत त्याच्याजवळ 1450 जबरदस्तीने काढून घेतले. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला.
याप्रकरणी अलीहुसेन उर्फ टिपू हकीकअली शहा (वय 21) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार आयुष नागेश लांडगे (वय 19), व्यंकटेश सुरेंद्र स्वामी (वय 25), आकाश गोपाल देवर (वय 25), अमोल शिंदे (वय 25), अनिकेत उमेश राचहवार (वय 19) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हा खडकीतील इंदिरानगर परिसरात राहत. हातगाडीवर सरबत विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. 4 डिसेंबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बत विक्री करून हातगाडी ढकलत तो घरी निघाला होता. यावेळी आरोपी त्याच्याजवळ आले. दमदाटी करत लोखंडी हत्याराचा धाक दाखवत त्याच्या खिशातील 1450 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
इतकच नाही तर आरोपीने हातगाडीवरील काचेचे ग्लास, चा पिंपळ आणि इतर साहित्य रस्त्यावर टाकून फिर्यादीला हाताने मारहाण केली दहशत निर्माण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली तर दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे.