पुण्यात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळला;‘पतित पावन’च्या आंदोलनातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 17:28 IST2025-03-16T17:25:54+5:302025-03-16T17:28:23+5:30

या चुकीमुळे आता आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे.

In Pune, a photo of Bahadur Shah Zafar was burned, mistaking it for Aurangzeb; details from the 'Patit Pavan' protest | पुण्यात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळला;‘पतित पावन’च्या आंदोलनातील प्रकार

पुण्यात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळला;‘पतित पावन’च्या आंदोलनातील प्रकार

-किरण शिंदे 

पुणे :
पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब याच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात आंदोलन केले. मात्र, या आंदोलनादरम्यान मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे.

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदोउदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर याचा फोटो जाळला.

या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, अनेक जण यावर टीका करत आहेत. काहींनी आंदोलनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.

औरंगजेबावरून वाद तापला

सध्या राज्यात औरंगजेबावरून मोठा वाद सुरू आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबची महती सांगणारे वक्तव्य केल्यानंतर याविरोधात अनेक संघटना आक्रमक झाल्या असून, त्याला जोरदार विरोध केला जात आहे. औरंगजेब क्रूर शासक होता आणि हिंदू धर्मीयांवर अत्याचार करणारा बादशहा होता, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आहे. त्यामुळे औरंगजेबचा गौरव करणाऱ्या वक्तव्यांवर सातत्याने आक्षेप घेतला जात आहे.

यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही होत आहे. काही मुस्लिम संघटनांनी मात्र औरंगजेबविषयीचे वाद विवाद निरर्थक असल्याचे सांगितले आहे.

बहाद्दूर शाह जफर कोण होते?

बहाद्दूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते. १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरोधात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून रंगून येथे पाठवले, जिथे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य जगले आणि निधन पावले. त्यांचा औरंगजेबशी कोणताही संबंध नव्हता, त्यामुळे त्यांचा फोटो जाळल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी चूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हे आंदोलन आणि त्यातील गफलत यावर पुढील काही दिवस राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

Web Title: In Pune, a photo of Bahadur Shah Zafar was burned, mistaking it for Aurangzeb; details from the 'Patit Pavan' protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.