पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी तरुणीवर कोयत्याने वार,MPSCचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:08 AM2023-06-28T09:08:41+5:302023-06-28T09:09:00+5:30
Crime News: एकतर्फी आकर्षणातून पुण्यातील सदाशिव पेठेत माथेफिरू तरुणाने भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली.
पुणे - एकतर्फी आकर्षणातून पुण्यातील सदाशिव पेठेत माथेफिरू तरुणाने भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणाने साहसी प्रसंगावधान दाखविल्यामुळे तरुणी थोडक्यात बचावली. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे. दर्शना पवार हत्येची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेसमोर आव्हान उभे राहिले आहे.
शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे हल्लेखोराचे नाव आहे. या घटनेत २१ वर्षीय तरुणी थोडक्यात बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी टिळक रोडवरील एका इन्स्टिट्यूटमध्ये इंटेरियर डिझायनरच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. कोथरूडमधील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिचा शंतनूशी परिचय झाला होता. मैत्री आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, शंतनू किरकोळ कारणावरून तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्यामुळे तरुणीने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. त्यानंतरही तो तरुणीला फोन करून धमकावत होता. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले होते.
मंगळवारी सकाळी तरुणी सदाशिव पेठेत आल्यानंतर शंतनूने तिच्यासह तिच्यासोबत असलेल्या मित्राला लक्ष्य केले व भररस्त्यात कोयता काढून तो तिच्या अंगावर धावून गेला. यावेळी तेथील लेशपाल या तरुणाने माथेफिरूचा हात पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर आसपासचे इतर तरुणही पुढे आले. त्यांनी माथेफिरू हल्लेखोराला रोखले आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.
मला एक मुलगी धावताना दिसली. वाचवा वाचवा, असे म्हणत ती धावत होती. मागून एक मुलगा हातात कोयता घेऊन धावत होता. हा सगळा प्रकार बघून लोक बाजूला होत होते. मला ती माझ्या बहिणीसारखी वाटली. मी मागचा पुढचा विचार न करता पुढे झालो. तो मुलगा वार करण्याच्या प्रयत्नात असताना मी त्याचा कोयता पकडला. इतक्यात एक मुलगा आला. त्याने त्याला मागून पकडले. एका मुलीचा जीव वाचवू शकलो, याचे समाधान आहे.
- लेशपाल जवळगे, धाडसी तरुण
लेशपाल हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ४ वर्षांपासून पुण्यात आहे. तो मूळचा आडेगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील आहे. तो मॅकेनिकल इंजिनीअर आहे.