Valentine Day: पुण्यात रिक्षाचालकांनी पोलिसांना दिले प्रेमपत्र अन् गुलाब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:17 PM2022-02-14T18:17:33+5:302022-02-14T18:17:50+5:30
पोलीस बांधवांनी सौजन्याची व सहानुभूतीची वागणूक रिक्षाचालकांना दिली
पुणे : बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने पुन्हा बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले होते. बाईक टॅक्सी कंपन्यांवर कारवाई कराच सोडून बाईक टॅक्सी चालवणाऱ्या गरीब युवकांना हजारो रुपये दंड हे सरकार आणि प्रशासन लावत असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला होता. तर काल रिक्षाचालकांनी पुणे आरटीओ समोर 1 तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी काही रिक्षाचालकांना अटक केली होती.
सरकार ने स्वतःचे तोंड लपवण्यासाठी पोलीस बांधवाना पुढे करून बघतोय रिक्षावाला चे विराट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध म्हणून बघतोय रिक्षावाला ने जेल भरो आंदोलन केले, परंतु अटकेत गेल्यावर पोलीस बांधवांनी जी सौजन्याची व सहानुभूतीची वागणूक रिक्षाचालकांना दिली. त्याने भारावून जाऊन आभार व्यक्त करण्यासाठी ज्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये रिक्षाचालकांना अटक करून नेले होते. त्या त्या पोलीस स्टेशनला जाऊन व्हॅलेंटाईन डे निमित्त आभाराचे पत्र व गुलाब पुष्प दिले. तसेच पोलीस बंधावांबद्दल असलेल्या गैरसमाजाचे निराकरण होऊन , वर्दी मागील माणसाबाबत आदर वाढल्याचे रिक्षाचालकांनी कळवले.