अबब! पुणे जिल्ह्यात मतदार यादीत १.४२ लाख जणांचे फोटो सारखेच
By नितीन चौधरी | Published: December 29, 2023 05:31 PM2023-12-29T17:31:00+5:302023-12-29T17:32:07+5:30
भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहित असणे आवश्यक आहे...
पुणे : निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदारयादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरू केली असून जिल्ह्यात २८ हजार दुबार नावे तर समान छायाचित्रे असलेली तब्बल १ लाख ४२ हजार ३४९ मतदार आढळले आहेत. यासाठी संबंधितांनी मतदारयादीत दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नोटिसा पाठविल्या असून या नोटिशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहित असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटिसा पाठविल्या आहेत.
या नोटिशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबंधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतीसह अपलोड करावे किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी. या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही देशमुख यांनी कळविले आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी, गुन्हा दाखल
मुळशी तहसील कार्यालयांतर्गत खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ, ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र. ६ दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता, विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद व महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भोर विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.