पुणे जिल्ह्यात ८१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण, सर्वात कमी हडपसरमध्ये, सर्वाधिक पुरंदरमध्ये

By नितीन चौधरी | Published: September 27, 2023 06:36 PM2023-09-27T18:36:53+5:302023-09-27T18:37:23+5:30

मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हडपसरमध्ये पडताळणी वेळ लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले....

In Pune district, 81 percent verification of voters is complete, lowest in Hadapsar, highest in Purandar | पुणे जिल्ह्यात ८१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण, सर्वात कमी हडपसरमध्ये, सर्वाधिक पुरंदरमध्ये

पुणे जिल्ह्यात ८१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण, सर्वात कमी हडपसरमध्ये, सर्वाधिक पुरंदरमध्ये

googlenewsNext

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात राज्यात मतदार पडताळणीची मोहीम राबविण्यात आली. काही कारणांमुळे या पडताळणीला विलंब होत असल्याने त्यासाठी पाच ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ही पडताळणी सुरू असून आतापर्यंत ८१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक ९८ टक्के मतदारांची पडताळणी पुरंदर विधानसभा मतदारसंघात झाली असून, सर्वात कमी २१ टक्के पडताळणी हडपसर मतदार संघात झाली आहे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हडपसरमध्ये पडताळणी वेळ लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतदार पडताळणी मोहिमेत मतदार यादीनुसार संबंधित मतदार त्या पत्त्यावर असल्याची खात्री केली जाते. तसेच तो हयात असल्यास त्याचे नाव कायम ठेवून त्याच्या मागणीनुसार फोटोमध्ये किंवा अन्य तपशिलात बदल करण्यात येतो. त्यासाठी अर्ज ही भरून घेतला जात आहे. पत्त्यावर नसलेल्या मतदारांची नावे कमी करण्याची मोहीमही याच पडताळणी उपक्रमात सुरू करण्यात आली आहे. तसेच मृत मतदारांची नावेही वगळण्यात येत असून या उपक्रमामुळे मतदार यादीचे शुद्धीकरणही होत आहे.

जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ही पडताळणी मोहीम अंतिम टप्प्यात आली असून पुरंदर मतदार संघामध्ये ९८.१२ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्या खालोखाल खेड आळंदी मतदारसंघात ९५.९९ टक्के तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ९५.५६ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी २१.२२ टक्के मतदारांची पडताळणी हडपसर मतदारसंघात झाली आहे. या ठिकाणी मतदान केंद्र अधिकारी अर्थात बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांची संख्या कमतरता असल्याने पडताळणीस उशीर लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतदारसंघनिहाय पडताळणीची टक्केवारी-

जुन्नर ७५.१०, आंबेगाव ८७.८८ खेड आळंदी ९५.८८, शिरूर ९०.८१, दौंड ९५.१३ इंदापूर ९१.४५, बारामती ९०.७७, पुरंदर ९८.१२, भोर ८९.३७, मावळ ९१.५४, चिंचवड ८५.५५ पिंपरी ८१.६३ भोसरी ७८.३१, वडगाव शेरी ७४.४९, शिवाजीनगर ९५.५६, कोथरूड ७५.२७, खडकवासला ६१.५५, पर्वती ९३.५९, हडपसर २१.२२, पुणे कॅन्टोन्मेंट ८२.९५ कसबा पेठ ९२.८९ एकूण ८१.०३

हडपसर मतदारसंघाच्या पडताळणीला विलंब लागत आहे. येथे मतदान केंद्र अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. याबाबत पुणे महापालिकेला एक महिन्यापूर्वी दोनदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मतदान केंद्र अधिकाऱ्यांची पूर्तता झाल्यानंतर या मतदारसंघातही पडताळणीला वेग येईल.

- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे

Web Title: In Pune district, 81 percent verification of voters is complete, lowest in Hadapsar, highest in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.