पुणे जिल्ह्यात वन पर्यटनस्थळी सूर्यास्तानंतर बंदीच; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:31 AM2024-07-02T09:31:09+5:302024-07-02T09:31:30+5:30
यापुढे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत....
पुणे : लोणावळ्यातील भुशी धरणात घडलेल्या दुर्घटनेनंतर वनक्षेत्रात असलेल्या पर्यटनस्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशावर बंदी आहे. या नियमाचे जिल्ह्यात यापुढे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापुढे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून हडपसरमधील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. हा नियम जुनाच असला तरी अशा पर्यटनस्थळांवर सर्रास पर्यटक दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. यापुढे या निर्णयाची अमंलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर आणि इंदापूर या तालुक्यातील डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव आदी परिसरात पावसाळी पर्यटनाकरिता येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्यात प्रामुख्याने वनविभाग आणि पाटबंधारे विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणांची गर्दीनुसार अ, ब, क अशा तीन प्रकारात वर्गवारी करून पर्यटकांची नोंद करावी. हे सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याबाबतची खात्री करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
यात अ दर्जाच्या (सर्वाधिक गर्दीचे किंवा पसंतीचे) ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी धारण क्षमता निर्धारित करावी. यासाठी अनुभवी दुर्ग अभ्यासक, पर्यावरण अभ्यासकांची मदत घ्यावी. गर्दी धारण क्षमतेनुसार नियंत्रित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पर्यटक परवाना देण्यात यावा, प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर हे पर्यटक परवाने देण्यात यावे. पोलिसांकडून सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणांवर विशेषकरून येण्या-जाण्याच्या मार्गावर, मोक्याच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिस, वनविभाग, पाटबंधारे विभाग यांनी आपल्या आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचावकार्यासाठी मदत करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना याबाबत प्रशिक्षण देणे, तसेच मदत व बचावकार्यासाठी लागणारे साहित्य त्यांना उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागाने जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यास करून आपत्कालीन आराखडा सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.