पुणे विभागात पावणेसात लाख नागरिक टंचाईच्या छायेत; ३३४ गावांना टँकरचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:14 PM2024-04-04T15:14:39+5:302024-04-04T15:15:16+5:30

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५७ टँकर सुरू असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात ९२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे...

In Pune Division, fifty-seven lakh citizens are under the shadow of scarcity; Tanker support to 334 villages | पुणे विभागात पावणेसात लाख नागरिक टंचाईच्या छायेत; ३३४ गावांना टँकरचा आधार

पुणे विभागात पावणेसात लाख नागरिक टंचाईच्या छायेत; ३३४ गावांना टँकरचा आधार

पुणे :दुष्काळाच्या छायेत असलेल्या पुणे विभागात मार्चअखेर पाणीटंचाईची समस्या अधिकच बिकट होत चालल्याचे चित्र आहे. विभागात एकूण ३६४ टँकरद्वारे ३३४ गावे तसेच १ हजार ८३३ वाड्या-वस्तांना पाणीपुरवठा होत असून, तब्बल पावणेसात लाख लोकसंख्या टंचाईमुळे बाधित झाली आहे. यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५७ टँकर सुरू असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात ९२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

अपुरा पावसाळा त्यातच परतीच्या पावसाने मारलेली दडी यामुळे यंदा पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात जलसाठ्यामध्ये वाढ होत असते. यंदा मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने धरणांमधील पाणीसाठासुद्धा अपुरा आहे. त्यातच पावसाळा पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने विहिरींच्या पाण्यातही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा नोव्हेंबरपासूनच बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात टँकर सुरू झाले होते. मार्चअखेरीस ही स्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.

अडीच लाख पशुधनाला टंचाईचा तडाखा

पुणे विभागात ३ एप्रिल रोजी ३६४ टँकरद्वारे ६ लाख ७२ हजार ८०७ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ३३२ टँकर खासगी आहेत, तर ३२ टँकर शासकीय आहेत. सबंध विभागात ३३४ गावे तसेच १ हजार ८३३ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची ही झळ अडीच लाख पशुधनाला ही बसली आहे.

सर्वाधिक टँकर साताऱ्यात

विभागात सर्वाधिक १५७ टँकर सातारा जिल्ह्यात सुरू असून, याद्वारे १५६ गावे तसेच ५६० वाड्या-वस्त्यांमधील २ लाख ६० हजार १९७ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यात ९२ टँकरद्वारे ६९ गावे व ४७७ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख ३२ हजार ५०३ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत आहे.

सांगली जिल्ह्यातही ७७ टँकरद्वारे ७५ गावे व ५३७ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख ७५ हजार ८३४ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत आहे. सोलापूर जिल्ह्यात ३८ टँकरद्वारे ३४ गावे व २५९ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख ४ हजार २७३ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. सुदैवाने कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही.

Web Title: In Pune Division, fifty-seven lakh citizens are under the shadow of scarcity; Tanker support to 334 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.