पुण्यात ‘एच३एन२’ने घेतला ज्येष्ठ नागरिकासह महिलेचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 02:24 PM2023-03-28T14:24:10+5:302023-03-28T14:24:49+5:30

दोघांना सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले

In Pune H3N2 killed a senior citizen and a woman | पुण्यात ‘एच३एन२’ने घेतला ज्येष्ठ नागरिकासह महिलेचा बळी

पुण्यात ‘एच३एन२’ने घेतला ज्येष्ठ नागरिकासह महिलेचा बळी

googlenewsNext

पुणे : देशभरासह पुण्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या स्वरूपात पसरलेल्या इन्फ्लुएन्झाचा ‘ए’ उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’च्या विषाणूने पुण्यात दोन बळी घेतले आहेत. यामध्ये पुण्यातील एक ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर दुसरी बीडमधील ३७ वर्षीय महिला आहे. गेल्या १३ दिवसांत हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून, सोबत दोघांनाही सहव्याधी होत्या. ‘एच३एन२’मुळे पुण्यात प्रथमच दाेन मृत्यू झाले आहेत.

शहरातील कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयात ६७ वर्षीय एच३एन२ बाधित ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू होते. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्याचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बीडच्या ‘एच३एन२ चा संसर्ग झालेल्या ३७ वर्षीय महिलेवर हडपसरच्या नाेबल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते. तर साेबतच ऑटाेइम्युन डिसिज, यकृताचा आजार व मेंदूत रक्तस्राव झालेला हाेता. तिचा २३ मार्च राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या दाेन्ही रुग्णांच्या मृत्यूचे सखाेल परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची मृत्यू पडताळणी समितीची शुक्रवारी बैठक झाली या बैठकीत तज्ज्ञ डाॅक्टरांनी या दाेन्ही रुग्णांचे उपचार, त्यांच्या मृत्यूचे कारण याचे बारकाईने परीक्षण केले असता दाेघांचाही मृत्यू ‘एच३एन२' ने झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. म्हणजेच सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.

डॉ. नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय सर्वेअलन्स युनिटमधील आराेग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मृत्यू पडताळणी समितीमध्ये सहभाग हाेता. या युनिटमध्ये महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुधीर पाटसुते, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नरेश सोनकवडे आणि डॉ. एच. बी. प्रसाद, डॉ. नायडूतील चेस्ट फिजिशियन डॉ. कार्तिक जोशी आणि नोबल रुग्णालयातील फिजिशियन डॉ. राज कोद्रे, सूर्या सह्याद्री रुग्णालयतील फिजिशियन डॉ. सुजाता गायकवाड आणि डॉ. महेश कुमार यांचा समावेश आहे.

''या दोन्ही रुग्णांना एन्फ्लूएंझा ‘एच३ एन२’' ची लागण झाली होती. यातील एक पुण्यातील, तर दुसरी बीडमधील महिला आहे. ती उपचारासाठी पुण्यात आली हाेती. शिवाय हे दोन्ही रुग्णांना सहव्याधी हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. या विषाणूची बाधा झाल्यावर त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. - डॉ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्यप्रमुख तथा साथरोग विभागप्रमुख, पुणे महापालिका.'' 

Web Title: In Pune H3N2 killed a senior citizen and a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.