PMC: पुण्यात नदीकाठच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा, पालिकेची धडक कारवाई
By राजू हिंगे | Published: June 27, 2024 08:26 PM2024-06-27T20:26:49+5:302024-06-27T20:31:15+5:30
पालिकेच्या बांधकाम विभागाने मुठा नदीच्या हरित पट्ट्यातील १५ मिळकतींवरील अनधिकृत बांधकाम, पत्राशेडवर कारवाई करत ९० हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे केले...
पुणे : राजाराम पुलापासून पुढे कर्वेनगरमध्ये मुठा नदीपात्राच्या लगत हरित पट्ट्यात जागा मालकांनी पक्के बांधकाम केले आहे. काही ठिकाणी शेड मारून मंगल कार्यालय, हॉटेल, गॅरेज आदी व्यवसाय सुरु केलेले होते. त्याविरोधात पालिकेने या जागा मालकांना नोटीस बजावलेली होती. त्याविरोधात जागा मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती उठवुन न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने मुठा नदीच्या हरित पट्ट्यातील १५ मिळकतींवरील अनधिकृत बांधकाम, पत्राशेडवर कारवाई करत ९० हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे केले.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान, तसेच कर्वेनगरमध्ये नदीपात्राच्या लगत हरित पट्ट्यात काही ठिकाणी पक्के बांधकाम केले आहे. तर काही ठिकाणी शेड मारून मंगल कार्यालय, हॉटेल, गॅरेज आदी व्यवसाय सुरु केलेले आहेत. हरित पट्ट्यात कोणतेही बांधकाम करता येत नाही त्यामुळे महापालिकेने या व्यावसायिकांना नोटीस देऊन कारवाईचा इशारा दिला होता. महापालिकेने कारवाई करू नये यासाठी १३ जागा मालकांनी २०२२-२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने महापालिकेला कारवाईस स्थगिती दिली. ही स्थगिती बुधवारी ( दि. २६) उठविण्यात आली, तसेच याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आज सकाळी महापालिकेच्या बांधकाम विभागाने मोठा फौजफाटा घेऊन कर्वेनगर येथे नदीलगत हरित पट्ट्यातील बांधकामावर कारवाई सुरु केली. यामध्ये १५ मिळकतींवरील ९० हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले आहे. यामध्ये ५ जेसीबी, २ गॅस कटर, १० कामगारांच्या मदतीने कारवाई केली. यावेळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारीही उपस्थित होते.
उर्वरित अनाधिकृत बांधकामावर शुक्रवारी कारवाई-
महापालिकेने सकाळी कारवाई सुरु केल्यानंतर जेसीबीने शेड पाडण्यास सुरवात केली. त्यावेळी शेडमधील गॅरेज, हार्डवेअरच्या दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासाठी व्यावसायिकांची गडबड सुरु झाली. हे साहित्य टेंपोमध्ये भरून इतर ठिकाणी हलविण्यात आले. उर्वरित अनधिकृत बांधकाम शुक्रवारी पाडले जाणार आहे.
कल्याणीनगर, कोंढवा खुर्द येथील ११ हजार चौरस फुटावर कारवाई-
कल्याणीनगर, हप्पीबार ४०० चौरस फुट, परगोला बार १०० चौरस फुट, कॅफे नेटोन १०० चौरस फुट, स्काय वेलवेदर ९०० चौरस फुट, कोंढवा खुर्द नवीन हद्द येथे अनाधिकृत बांधकामावर ५ ठिकाणी कारवाई करून ११ हजार ५२५ चौरस फुट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.