पुण्यात थंडीच्या कडाक्याऐवजी गरमीचा तडाखा, नोव्हेंबरमध्ये कमी गारवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:03 PM2023-11-07T21:03:39+5:302023-11-07T21:04:06+5:30

अनेकांना खोकला, ताप, सर्दी होत आहे...

In Pune, instead of harsh winters, the heat is hot, it is less cold in November | पुण्यात थंडीच्या कडाक्याऐवजी गरमीचा तडाखा, नोव्हेंबरमध्ये कमी गारवा

पुण्यात थंडीच्या कडाक्याऐवजी गरमीचा तडाखा, नोव्हेंबरमध्ये कमी गारवा

पुणे : शहरासह राज्यात कमाल व किमान तापमानामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधील थंडी कमी प्रमाणात जाणवत आहे. याउलट थंडीच्या काळात गरमी जाणवत आहे. या हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना खोकला, ताप, सर्दी होत आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात ढगांची निर्मिती झाली असून, महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात पावसाचा अंदाज आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वीच थंडीचा कडाका जाणवतो. परंतु, यंदा मात्र दिवाळी आली तरीदेखील थंडीऐवजी गरमी होत आहे.

कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वरच असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात उन्हाची ताप अधिक असल्याने डहाणू येथे उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३५ अंशाच्या दरम्यान नोंदविले गेले आहे.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ कायम असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ अंशाच्या वरच आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने मंगळवारी (दि. ७) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

इथे सर्वांत कमी तापमान

शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळे तापमान नोंदवले आहे. कोरेगाव पार्कला किमान तापमान २०.२, मगरपट्टा २१.६, लोहगाव १८, पाषाण १७.१ अशा तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाळ्यातदेखील कोरेगाव पार्क, मगरपट्टा या परिसरात सर्वाधिक तापमान अनुभवायला मिळाले आहे. स्थानिक काही घटकांमुळे अशी स्थिती निर्माण होत असावी, असा अंदाज आहे.

पुणे कमाल तापमान : ३१.४

पुणे किमान तापमान : १६.४

अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती झाली आहे. गोव्यापासून ते कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुणे, जिल्ह्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात ११ नोव्हेंबरनंतर ढग जाऊन आकाश निरभ्र राहणार आहे. ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान पुण्यात ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाची शक्यता आहे.

- अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र अंदाज विभाग, पुणे

Web Title: In Pune, instead of harsh winters, the heat is hot, it is less cold in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.