Pune Ganpati: पुण्यात गणेशोत्सवात शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 09:46 AM2022-08-03T09:46:21+5:302022-08-03T09:46:29+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली
पुणे : गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी शांतता पाळून उत्सव साजरा करावा. शेवटचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दिवसभराच्या दौऱ्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ऐतिहासिक वारसा असलेली गणपती मंडळे पुण्यात आहेत. कोविडमुळे सण-उत्सव साजरा करता आला नव्हता; पण आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचा आहे. मंडप शुल्क माफ केलाय, परवानगीसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. नियम पाळून मिरवणुका करू, कुठल्याही अडचणी येणार नाही हे पाहू. न्यायालयाचे नियम पाळू. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन मदत करेल. दहीहंडी मंडळाला पण परवानग्या दिल्या आहेत.’’
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळ विस्तार, ओला दुष्काळाबाबत अजित पवार यांना सांगू. आम्ही राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलो. सगळी माहिती घेतली. मदत केली. पूर हाेता तेव्हा गेलो. पूर ओसरल्यावर गेलो नाही. सरकार संवेदनशील आहे. मी दोन-तीन दिवस आढावा बैठक घेतोय. लोक रात्रीपर्यंत वाट पाहतात. लोक आशीर्वाद देतात. पुणेकरांनी स्वागत केले. धन्यवाद.’’