Mhada Lottery: पुण्यात ‘म्हाडा’ पुन्हा देणार तुम्हाला घर; ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 10:24 AM2023-09-06T10:24:08+5:302023-09-06T10:24:22+5:30

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय

In Pune Mhada will give you a house again Start applying online | Mhada Lottery: पुण्यात ‘म्हाडा’ पुन्हा देणार तुम्हाला घर; ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात

Mhada Lottery: पुण्यात ‘म्हाडा’ पुन्हा देणार तुम्हाला घर; ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात

googlenewsNext

पुणे : म्हाडानेपुणे, पिंपरी चिंचवड शहरासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज भरण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची मुदत २७ सप्टेंबर आहे. तर संगणकीय सोडत १८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. म्हाळुंगे येथील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील सदनिकांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाचे (म्हाडा) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते भरणा अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. याबाबत ‘म्हाडा’च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील म्हणाले, “या सोडतीमध्ये पुणे जिल्ह्यातील पाच हजार ४२५ सदनिका, सोलापूर ६९, सांगली ३२ व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २,५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २,४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

म्हाडाच्या मंडळाच्या पुणे कार्यालयात १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. यासाठी आधी नोंदणी करावी लागणार असून, त्यानंतर अशा नोंदणी केलेल्यांनाच अर्ज करता येणार आहे. मंगळवारपासून (दि. ५) ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून, नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल. तर अर्ज करण्यासाठी ६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपासून सुविधा उपलब्ध असून, अंतिम मुदत २७ सप्टेंबरला रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे. २९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस किंवा एनएफईटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ९ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध होणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

''गेल्या सोडतीत संगणकीय त्रुटी दूर केल्यानंतर आता ही प्रक्रिया सुरळीत होईल. सोडत काढल्यानंतर विजेत्यांना तत्काळ ऑनलाइन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र आणि तात्पुरते देकार पत्र पाठवावे, अशी सूचना केली आहे. - संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा'' 

Web Title: In Pune Mhada will give you a house again Start applying online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.