Friendship: पुण्यात मित्रप्रेमानं घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर; एक अनोखा स्नेहमेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:11 PM2022-05-11T14:11:03+5:302022-05-11T14:11:17+5:30
आपल्या ४२ मित्रांना विमानाने हैद्राबादची सफर घडवून आणली
पुणे : शालेय जीवनात झालेली मैत्री अनेक वर्ष टिकवून ठेवण्यात एक वेगळाच आनंद असतो. ज्या मित्रांसोबत आपण मजा, खोडसाळपणा केला. अशा मित्रांना ३०, ३५ वर्षांनंतर भेटल्यावर शाळेतल्या त्या आठवणींना उजाळा येतो. अशाच मित्र मैत्रिणींचा स्नेहमेळावा नेहमी होत असतो. असच एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले. देहूतील संत तुकाराम विद्यालयातील मित्र मैत्रिणी तब्बल ३३ वर्षानंतर एकत्र भेटले. १९८९ सालच्या बॅचमधली मुले नुकतीच एकत्र आली होती. त्यांच्यापैकी एका उद्योजकाने एवढ्या वर्षानंतर भेटल्याचे औचित्य साधून आपल्या ४२ मित्रांना विमानाने हैद्राबादची सफर घडवून आणली. पिंपरी चिंचवड भागातील चाकण येथे राहणाऱ्या विलास जामदार यांनी हे कौतुकास्पद कार्य केले आहे.
या सहलीत जीवनात प्रथमच विमान प्रवास करणारे तब्बल ३६ मुले-मुली होत्या. प्रथमच विमानात प्रवास झाल्याने त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. जामदार हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी जवळपास ५५० तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. तर कोरोना काळात गरजूंना धान्य व औषधे वाटप करण्यासह आरोग्य विषयक सेवा पुरविल्या आहेत. निराधार मुलांच्या दवाखान्याचा खर्च केला. गरजू मुलांच्या शैक्षणिक खर्चास मदत केली. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या मुला-मुलींच्या लग्न कार्यात मदत केली आहे. तसेच, अवसरी, शिंदेगाव, वराळे, निराधार आकुर्डी, निमगाव दावडी आदी भागात गणेश मंदिरांना मदत केली आहे.
३६ जणांची पहिलीच विमानसफर
हैद्राबादची सफर झाल्यावर सर्व मित्र भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यापैकी काही जण पन्नाशीच्या उंबरठयावर होते. तर काहींना आजारांनी गाठायला सुरुवातही केली होती. पण जामदार यांनी घडवून आणलेली सफर त्यांना पुनर्जीवित करणारी ठरली. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.