पुण्यात एकेकाळी मनसेला २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य; विधानसभेला जोर लावला तर होणार चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:27 PM2024-10-17T16:27:57+5:302024-10-17T16:28:44+5:30

पुण्यातील खडकवासला, कसबा, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर भागातून अजूनही मनसेला लाखांच्या घरात मताधिक्य

In Pune MNS once had more than 2 lakh votes If the assembly is pushed, there will be a tough fight | पुण्यात एकेकाळी मनसेला २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य; विधानसभेला जोर लावला तर होणार चुरशीची लढत

पुण्यात एकेकाळी मनसेला २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य; विधानसभेला जोर लावला तर होणार चुरशीची लढत

पुणे : पुण्यात एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तब्बल २९ नगरसेवक आणि २ आमदार होते. पुण्यातील खडकवासला, कसबा, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर याबरोबरच ग्रामीणच्या जुन्नर भागातून मताधिक्य होते. जुन्नर मधून मनसेच्या शरद सोनावणे निवडून आल्या होत्या. खडकवासला मतदार संघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे २५ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी मनसेला संपूर्ण शहराच्या विधानसभा मतदार संघातून २ लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. आताही राज ठाकरेंनी सर्वाधिक जागा आम्हीच लढणार असल्याचे सांगितल्यावर पुण्यातूनही मनसेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. विधानसभेला जोर लावला तर चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.      

पुण्यात एकेकाळी मनसेची वेगळीच क्रेझ तरुणांमध्ये होती. राज ठाकरेंचे भाषण, मराठी भाषेबाबत आंदोलन, मराठी तरुणांना कामे मिळाली पाहिजेत असा अजेंडा यामुळे तरुण वर्ग या पक्षाकडे आकर्षित होऊ लागला होता. २००९ साली कसबा विधानसभा मतदार संघातून धंगेकर यांनी मनसे पक्षाकडून आमदारकी लढवली होती. तेव्हा त्यांनी २ नंबरवर राहून बापटांना चांगलीच लढत दिल्याचे दिसून आले होते. तर हडपसर वसंत मोरे यांनी मनसेकडून लढत देत २ नंबरचे स्थान मिळवले होते. त्याच वेळी खडकवासला मतदार संघातून सोनेरी आमदार म्हणून ओळखले जाणारे रमेश वांजळे निवडून आले होते. तसेच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोथरूड मतदार संघातून किशोर नाना शिंदे यांनी २ नंबरवर राहून ४४ हजारच्या आसपास मताधिक्य मिळवले होते. मागील निवडणुकीतही चंद्रकांत पाटलांच्या विरोधात किशोर शिंदे यांनी कोथरूड विधानसभेतून चांगलीच लढत दिल्याचे दिसून आले. आताही लोकसभा न लढवल्याने मनसे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असे सवाल उपस्थित होऊ लागले होते. अखेर राज ठाकरेंनी दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सार्वधिक जागा लढल्याचे जाहीर केले. 

पुण्यात मनसेला आता चुरशीची लढत देता येईल का? 

पुणे शहराच्या प्रमुख विधानसभा मतदार संघात अजूनही मनसेची अगणित मतं आहेत. अजूनही तरुण वर्ग राज ठाकरेंचा मोठा फॅन आहे. मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंचा शब्द पाळत पक्षासाठी झटताना दिसून येत आहेत. २९ नगरसेवक असताना मनसेने ज्याप्रमाणे काम केले होते. सामान्य माणसांशी दांडगा संपर्क निर्माण केला होता. त्याप्रमाणे आताही जोर लावल्यास विधानसभेला आमदार निवडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता मनसेने लोकसभा लढवली नाही. त्यामुळे या पक्षाबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले होते. पण जर आताच्या विधानसभेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत वाद बाजूला ठेवून जोर लावल्यास या पक्षालाही विधानसभेत चुरशीची लढत देता येईल असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. 

लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा 

लोकसभेत राज ठाकरेंच्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. पुण्याच्या लोकसभेतही खासदार मुरलीधर मोहोळ यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्याबरोबर फिरून या कार्यकर्त्यांनी प्रचारही केला होता. मनसेने भाजपला पाठींबा दिल्याने हा त्यांचा प्लस पॉईंट ठरला असल्याची चर्चा पुण्यात आहे. त्यामुळे आताच्या विधानसभेलाही पुणेकरांकडून मनसेला फायदा होण्याची आहे. 

Web Title: In Pune MNS once had more than 2 lakh votes If the assembly is pushed, there will be a tough fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.