पुण्यात दररोज अपघातात एकाचा जातोय बळी; वर्षभरात तब्बल १ हजार २३१ अपघात
By विवेक भुसे | Published: January 9, 2024 10:57 AM2024-01-09T10:57:17+5:302024-01-09T10:57:58+5:30
अपघातावर नियंत्रण राहावे यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतूक नियम तोडण्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई
पुणे: वाहनांची वाढती संख्या अन् सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे पुणेकरांचा जीव गुदमरून जात असताना शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातात सरासरी दररोज एका पुणेकराला प्राणास मुकावे लागत आहे. वर्षभरात शहरात १२३१ अपघात झाले असून, २०२२ च्या तुलनेत तब्बल ३५९ अपघात वाढले आहेत.
पुणे शहरात दररोज शेकडोने वाहनांची भर पडत आहे. त्यात मेट्रोची कामे सुरू असल्याने अनेक रस्त्यांवर वाहतूक काेंडीला नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या कोंडीतून बाहेर पडल्यावर उपनगरांमध्ये वाहनांचा वेग आपसूक वाढतो. त्यातून शहरात प्रवेश करणाऱ्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडलेल्या दिसून येत आहे. मध्य वस्तीतील अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त असले तरी त्याचा परिणाम या परिसरात अपघाताचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
शहरात गेल्या वर्षभरात ३१७ प्राणघातक अपघात झाले असून, त्यात ३३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ६२० गंभीर अपघात झाले असून, त्यात ७०९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १५७ किरकोळ अपघात घडले असून, त्यात १९३ जण जखमी झाले आहेत. १३७ अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नव्हते. या अपघातात सर्वाधिक पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल दुचाकीस्वार अपघातात सापडले आहेत.
अपघातावर नियंत्रण राहावे यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतूक नियम तोडण्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असली तरी त्यांना न जुमानता वेगाने वाहने जात असल्याचे या अपघातांच्या संख्येवरून दिसून येत आहे.
अडीच लाख वाहने उचलली
नो पार्किंगमध्ये वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा आणणारी वाहने टोईंग करून उचलली जातात. त्यात प्रामुख्याने दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या वर्षभरात टोईंग वाहनांनी तब्बल २ लाख ६६ हजार ३५७ वाहने उचलण्यात आली. त्यांच्याकडून १५ कोटी १४ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही मार्फत ४ लाख २८ हजार ६१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यावर ३६ कोटी ८३ लाख ९७ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी डिव्हाईस मार्फत ३ लाख ३८ हजार ३५३ वाहनांवर कारवाई करून त्यांना २६ कोटी २८ लाख ९१ हजार ५५० रुपयांचा दंड केला आहे. वेगवेगळ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० लाख ३३ हजार ३२५ वाहनांवर पोलिसांनी गत वर्षभरात दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून तडजोडीअंती ७८ कोटी २६ लाख ९१ हजार ३५० रुपये दंड वसूल केला आहे.