Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाने सर्वत्र हाहाकार, नागरिकांचे खूप नुकसान; पालिकेचे डोळे कधी उघडणार? मेधा कुलकर्णींचा सवाल
By श्रीकिशन काळे | Published: June 9, 2024 04:39 PM2024-06-09T16:39:29+5:302024-06-09T16:40:12+5:30
पुणे महापालिकेने कित्येक ठिकाणी नाले बुजवले, यासारखं तर दुसरं महापाप नसेल - मेधा कुलकर्णी
पुणे: शहरात शनिवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार झाला. अनेक नागरिकांचे मला फोन आले. वेगवेगळ्या सोसायटीमधून, वस्त्यांमधून फोन येत होते. मी पुण्यात नसल्याने काही करू शकले नाही. पण जिथून फोन येत होते, तसे तसे त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी मी बोलत होते. परंतु मला या सगळ्यामुळे खूप खेद वाटतो की, नागरिकांचे खूप नुकसान झाले. आता तरी प्रशासनाने डोळे उघडणार आहेत का? अशी टीका खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेवर व्यक्त केली आहे.
पावसामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले पाण्यात अडकली. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. वेळ वाया गेला. हे नुकसान भरून काढता येणारच नाही. पण चीजवस्तूंचे जे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई व्हावी, अशी माझी प्रशासनाकडे आग्रही मागणी आहे. कारण काही ठिकाणी घराघरांमध्ये पाणी जाऊन टीव्ही आणि इतर वस्तू खराब झाल्या आहेत. अर्ध्या तासाच्या पावसामुळे पाणी मीटर रूमपर्यंत गेले. यातून काहीही अनर्थ ओढवला असता. महापालिकेने आणि यंत्रणांनी याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता होती, असे कुलकर्णी यांनी म्हटले.
अनेक विविध गैर गोष्टींकडे झालेलं दुर्लक्ष, त्यातून ही दुरावस्था पुणे शहरावर ओढवली आहे. आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीची यंत्रणा कमी पडते आणि नागरिकांना स्वतःच स्वतःच्या मदतीला धावावे लागते, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. महापालिका प्रशासनाने या सर्व व्यवस्था पुन्हा मुळापासून दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मी वारंवार अशा अनेक विषयात आवाज उठवला आहे. सर्वप्रथम अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला हवी. पावसाळी पाण्याची गटारे किती तरी ठिकाणी अस्तित्वात नाहीत, आहेत ती साफ नाहीत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन त्यात एकत्र झाल्या आहेत. त्या व्यवस्थित करायला पाहिजेत.
कित्येक ठिकाणी नाले बुजवले आहेत. यासारखं तर महापाप दुसरं नसेल. या सर्व गैरव्यवस्थांमुळे नागरिकांचे नुकसान झाले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वेळा या संदर्भात मी मागण्या केलेल्या आहेत, आवाज उठवला आहे. यापुढेही आपण (नागरिकांनी) संघटीत होऊन ज्या ज्या ठिकाणी नाले बुजवले असतील, ज्या ज्या ठिकाणी नाल्यांवर बांधकाम केले असतील आणि अन्य काही गैरप्रकार असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. - मेधा कुलकर्णी, खासदार