पुण्यात भाजपने नदी स्वच्छतेचे बॅनर तर लावले; पण कामाला सुरुवात झाली का? सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:37 PM2022-02-15T15:37:31+5:302022-02-15T15:41:04+5:30
भाजपने पुनरुज्जीवन नदीचे समृद्धीकरण शहराचे असे बॅनर संपूर्ण शहरात लावले आहेत
पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून मुळा - मुठा नदी सर्वांचे लक्ष वेधणारी नदी आहे. परंतु नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, निर्माल्य, जलपर्णी यामुळे नदीची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नदी स्वच्छता आणि सुशोभीकरण हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवतांना नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग सिद्ध केले जाणार आहेत, तर नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी काढून ते उंच करावे लागणार आहेत.
गेली कित्येक वर्षे या प्रकल्पला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपने पुनरुज्जीवन नदीचे समृद्धीकरण शहराचे असे बॅनर संपूर्ण शहरात लावले आहेत. परंतु कामाला अजूनही सुरुवात झालेली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौऱ्यावर असताना हे बॅनर बघून फेसबुक लाईव्ह केले आहे. संपूर्ण शहरात बॅनर तर लावले आहेत, पण कामाला सुरुवात झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुळे म्हणाल्या, मी गेल्या दोन दिवसापासून पुणे शहराच्या दौऱ्यावर आहे. आता सहज फिरताना शाहू सेतू पुलाजवळ भाजपचे हे पोस्टर पाहिले. त्यात भाजपने तीन प्रकारे नदीचे फोटो दाखवले आहेत. आधी मुठा नदी कशी होती. उद्या या नदीचे चित्र कसे असेल हे दाखवण्यात आले आहे. परंतु उद्याचा अर्थ काय? हे बॅनर बघून कळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर यात काही काम झालंय का, अथवा कामाला सुरुवात झालीये का असा सवालही उपस्थित केला आहे.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुणे महापालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपने संपूर्ण पुणे शहरात अशा प्रकारचे बॅनर लावले आहेत. हे पाहून पुणेकरांना नदी स्वच्छ झाल्याचे वाटू लागले. परंतु प्रत्यक्षात कामालाही अजून सुरुवात झाली नाही. पालिकेत शंभर नगरसेवक असणाऱ्या भाजपला या नदीतील साधी जलपर्णीची काढता येत नाही. तर हे कधी नदी सुधारणा करणार असंही ते म्हणाले आहेत.
काय आहे बॅनरवर
भाजपने लावलेल्या बॅनरवर नदीचे दोन फोटो देण्यात आले आहेत. एका फोटोत 'आज' असे लिहून बिकट अवस्थेतील नदी दाखवली आहे. तर दुसऱ्या फोटोत 'उद्या' असे लिहून सुशोभीकरण झाल्यावरच्या नदीचे चित्र दाखवण्यात आले आहे.