पुण्यात डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास
By नितीश गोवंडे | Published: September 29, 2023 12:21 PM2023-09-29T12:21:43+5:302023-09-29T12:21:52+5:30
१०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला जात असल्याने अनेकांचा थरकाप उडत होता
पुणे : गणेश विसर्जन मार्गावरील डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे चित्र गुरुवारी संध्याकाळी सर्वच ठिकाणी दिसून आले. या आवाजामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. टिळक रस्त्यावरील काही रहिवाशांनी अख्खी रात्र जागून काढल्याचे सांगितले. १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला जात असल्याने अनेकांचा थरकाप उडत होता. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील यामुळे त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सकाळी ६ पासूनच गणरायाचे विसर्जन करून जाणाऱ्या गणेश मंडळांनी देखील डीजे वाजवतच परतीचा मार्ग अवलंबल्याने टिळक चौकात मोठा गोंगाट झाला.
संध्याकाळी ६ नंतर टिळक चौकात एकच गर्दी जमल्याने लोकांना चालणे देखील अवघड झाल्याचे चित्र दिसून येत होते. त्यातच डीजे, ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशांच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मध्यरात्री १२ वाजता थांबलेला आवाज सकाळी सहा वाजता पुन्हा धडधडायला लागल्याने पोलिस प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षी पेक्षा यंदा आवाज कमी..
गेल्या वर्षी विसर्जनाच्या मिरवणुकीत १०५.२ डेसिबल एवढी ध्वनीपातळी नोंदवली गेली होती. याआधी २०१३ साली १०९.३ डेसिबल ही सर्वाधिक ध्वनीपाळी नोंदवली गेली. कोरोना काळात विसर्जन मिरवणूक न झालेल्या २०२० आणि २०२१ मध्ये ५९.८ डेसिबल ध्वनीपातळीची नोंद होती. यंदा इतर वर्षीच्या तुलनेत कमी डेसिबलची नोंद होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.