पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली! बंदी घालूनही येरवड्या मद्यविक्री; ‘हॉटेल प्लिंक’वर छापा
By नितीश गोवंडे | Published: June 29, 2024 04:24 PM2024-06-29T16:24:41+5:302024-06-29T16:26:07+5:30
अखेर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या हॉटेलवर शुक्रवारी (दि. २८) कारवाई करत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर चौघांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : विनापरवाना तसेच वेळेचे उल्लंघन करणाऱ्या पब, बार आणि रुफटॉप हॉटेलवर पोर्शे कार अपघातानंतर पोलिस, एक्साईज आणि महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. येरवड्यातील ‘हॉटेल प्लिंक’च्या चालकाने मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मद्य विक्री सुरू ठेवली होती. अखेर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या हॉटेलवर शुक्रवारी (दि. २८) कारवाई करत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर चौघांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुजोर आणि धनाढ्य पब, बार चालकांमध्ये प्रशासन आपले काय वाकडे करणार असा समज आहे, हे या उदाहरणावरून दिसून येते. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत हॉटेल प्लिंक येथे मद्यविक्री करण्यास बंदी घातली होती. हॉटेलचे मद्यविक्रीचे लायसन्स सस्पेंड असताना देखील तेथे मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली.
कृष्णा रामचंद्र नेवपाने (३४, रा.अन्सारी कॉम्प्लेक्स, संजय पार्क), मॅनेजर गौरव मंगेश वाघोलीकर (२५, रा. आदर्श नगर, वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली असून, जनरल मॅनेजर दीपक देविदास मंडवले (४३, रा. सर्वोदय रेसिडेन्सी, विशाल नगर, पिंपळे निलख) आणि मालक विवेक दिलीप चड्डा यांच्यावर देखील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस शिपाई अविनाश कोंडे यांनी फिर्याद दिली आहे.
येरवड्यातील क्रिएटीसिटी मॉलमध्ये असलेल्या किंग्स फूड अँड ब्रेवरी, हेलियम बार अँड रेस्टॉरंट या कंपन्यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘हॉटेल प्लिंक’ वर गुन्हे शाखेचा छापा टाकला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला याठिकाणी बेकायदा विदेशी दारु आणि बिअर विकली जात असल्याचे समजल्यावर कारवाई करुन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोर्शे कार अपघातानंतर पुण्यातील पब, बार, रुफटॉप हॉटेलचा विषय ऐरणीवर आला होता. त्यानंतर काही दिवसांच्या कारवाईनंतर प्रशासकीय पातळीवर हा विषय पुन्हा थंड बस्त्यात गेला होता. मात्र एफसी रोडवरील एल ३ बार प्रकरणानंतर पुन्हा प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. पुणे पोलिसांनी हॉटेल चालकांना नियम व अटी घालून दिल्या आहेत. मात्र, याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. यावर सर्वच स्तरातून यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. पुणे पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेलवर बुलडोझर चालवत अवैध बांधकामे जमिनदोस्त केली आहेत. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तब्बल ७० बार बंद केले आहेत.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला ‘हॉटेल प्लिंक’ येथे बेकायदेशीर दारु विकली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन याठिकाणी छापा टाकला. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचा चालक चोरून दारू विकत होता. यापूर्वी हे हॉटेल सील करण्याबाबत अहवाल पाठवण्यात आला होता. ६ जून रोजी येरवडा पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्लिंक हॉटेलवर चोरून दारु विकताना मिळाल्याबाबत एकत्रितपणे छापा टाकला होता. हे हॉटेल सील करण्याबाबत पुन्हा स्मरणपत्र पाठवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.