H3N2 Virus: पुण्यात काेराेना, ‘स्वाइन फ्लू’ च्या तुलनेत ‘एच३ एन२’ चे रुग्ण सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 07:11 PM2023-03-17T19:11:14+5:302023-03-17T19:11:37+5:30
सर्दी, खाेकला, जास्त काळ राहणारा ताप आणि २० ते २५ दिवस राहणारा खाेकला ही लक्षणे
पुणे : सध्या काेराेना, स्वाइन फ्लू, इन्फ्लूएंझा बी यांच्या तुलनेत ‘एच३ एन२’ विषाणूचे पेशंट अधिक आढळून येत आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही)च्या तपासणीतून पुढे आली आहे. यामुळे सध्या ‘एच ३ एन २’ हा व्हायरस जास्त प्रबळ असून, याने सर्वाधिक रुग्ण बाधित हाेत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय आराेग्य विभागाअंतर्गत पुण्यात ‘एनआयव्ही’ ही संस्था वातावरणातील विषाणूंचे सर्वेक्षण, संशाेधन करते. त्यामध्ये वातावरणात काेणते विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्याचे नमुने घेऊन, आलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला जाताे. येथील राष्ट्रीय इन्फ्लूएंझा सेंटरला हे नमुने पुणे शहर व जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून पाठविले जातात. यामध्ये महापालिकेच्या १२ स्वॅब सेंटर्सवरूनही हे नमुने पाठविले जातात. यामध्ये प्रामुख्याने काेराेना, इन्फ्लूएंझा लाईक इलनेस (आयएलआय), सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन (सारी) या नमुन्यांचे सर्वेक्षण व संशाेधन केले जाते.
पुणे जिल्ह्यातून जानेवारी ते १० मार्चपर्यंत एकूण २ हजार ५२९ नमुने तपासणीसाठी आले हाेते. त्यापैकी ४२८ जणांचे नमुने (१६.९ टक्के) केवळ ‘एच ३ एन ३’ या विषाणूसाठी पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यापाठाेपाठ स्वाइन फ्लूसाठी ६ (०.२ टक्के), ‘इन्फलूएंझा बी’चे ३९ (१.५४ टक्के) आणि काेराेनाचे ३५ (१.३८ टक्के) पेशंट आढळले. यावरून सध्या सर्वाधिक पेशंट हे ‘एच ३ एन २’चे आढळून येत असल्याचे दिसून येते.
''गेल्या दीड महिन्यापासून व्हायरलचे रुग्ण माेठ्या प्रमाणात येत हाेते. सर्दी, खाेकला, जास्त काळ राहणारा ताप आणि २० ते २५ दिवस राहणारा खाेकला ही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसत हाेती. बरे हाेण्यासाठी वेळ लागत हाेता. परंतु, ॲडमिट करण्याची गरज नव्हती. आता चार ते पाच दिवसांपासून हे पेशंट कमी हाेत आहेत. खासगी ओपीडीमध्ये जे पेशंट येतात त्यांची प्रत्येकाची स्वॅब घेऊन तपासणी हाेत नाही. त्यामुळे त्यांना काेणत्या विषाणूचा प्रादुर्भाव आहे, हे कळत नाही. ते केवळ सरकारी स्वॅब सेंटर यंत्रणेद्वारे चाचणीसाठी पाठविल्यावरच कळते. - डाॅ. संजय गायकवाड, जनरल प्रॅक्टिशनर, दत्तवाडी''