शिरूरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या टक्केवारीत मोठी घसरण; कोल्हे, आढळरावांची धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:34 AM2024-05-14T09:34:14+5:302024-05-14T09:34:46+5:30
मतदार डॉ. अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा संधी देणार, की सलग ३ वेळा निवडून आलेल्या आढळरावांना यांना विजयी करणार
पुणे : राज्यात प्रचंड चुरशीची झालेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी ५१.४६ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, आदिवासी भागात दुपारी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव- पाटील यांनी राष्ट्रवादीकडून आव्हान दिले आहे. जुन्नरमधील दुर्गम आदिवासी भागापासून ते हडपसरमधील आयटी पार्कपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात गेल्या एक महिन्यापासून रंगतदार प्रचार झाला. दोन्ही बाजूंकडून प्रचंड शक्ती लावण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानात ही चुरस दिसली नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, गेल्या वेळीपेक्षा ८.४ टक्के मतदान कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी शांततेच्या वातावरणात मतदान पार पाडले, गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी खेड तालुक्यातील सहा मतदान केंद्रे, लोणीकाळभोर येथील एका केंद्रावर मतदान यंत्रात विधाङ झाल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यंत्रातील दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोसरी आणि हडपसर मतदारसंघांत अपेक्षित असे मतदान झाले नाही. नागरिकांनी सकाळी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदान केले. परंतु, दुपारनंतर मात्र गर्दी ओसरली. शिरूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ५१,४६ टक्के मतदानाची नोंद झाल्याचा अंदाज आहे. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे.
प्रचारादरम्यान, चाकणची वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटीपासून ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होऊन मतदानाची टक्केवारी वाढेल असे दिसत होते. मात्र मतदारांनीच पाठ फिरवल्याने डॉ. अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा संधी देणार, की सलग तीन वेळा निवडून आलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करणार यांची प्रचंड उत्सुकता आहे. दोघांचेही भवितव्य मतदान यंत्रात बंद असून ४ जूनला फैसला होणार आहे.
हडपसरमध्ये सर्वांत कमी मतदान
शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर आणि भोसरी हे शहरी मतदारसंघ नेहमीच निर्णायक भूमिका बजावत असतात, मात्र, यावेळी सर्वांत कमी मतदान हडपसर मतदारसंघात कमी झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, हडपसर ३८.०४ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ शिरूर ४१.१५, भोसरी ४२.२४, जुन्नर ४७.३९, खेड-आळंदी ४८.०७ तर आंबेगावला ५३.७१ टक्के मतदान झाले आहे.
रात्रभर अनेक ठिकाणांहून पैसे वाटप होत असल्याचा तक्रारी आलेल्या आहेत, विरोधकांवर जेव्हा अशा पद्धतीने मते विकत घेण्याची वेळ येत असेल, तर चित्र स्पष्ट आहे. पण, सर्वसामान्य कष्टकरी यांच्यासाठी झटणाऱ्याच्या पाठीमागे जनता असेल.- अमोल कोल्हे उमेदवार, महाविकासआघाडी
मी एकही आरोप केलेला नाही. केवळ विकास हा मुद्दा घेऊन पुढे गेलो. मात्र, समोरच्या उमेदवाराने खालच्या पातळीवर जाऊन हीन दर्जाचे आरोप केले आहेत. माझ्यावर आरोप केला. विरोधी उमेदवाराकडे विकासाचे मुद्दे व प्रचारात सांगण्यासाठी काहीही मुद्दे नव्हते.- शिवाजीराव आढळराव-पाटील उमेदवार, महायुती