पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त वाहनचालकांना असाही मिळतो बोनस!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:57 AM2022-11-03T09:57:23+5:302022-11-03T09:57:50+5:30

सीटबेल्टचा कंटाळा केला अन् घोटाळा झाला...

In the city of Pimpri-Chinchwad, reckless drivers also get such a bonus traffic police | पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त वाहनचालकांना असाही मिळतो बोनस!

पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त वाहनचालकांना असाही मिळतो बोनस!

googlenewsNext

- नारायण बडगुजर 

पिंपरी : दिवाळीत खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने वाहतुकीचा काही ठिकाणी खोळंबा झाला. यात बेशिस्त वाहनचालकांमुळे भर पडली. अशा बेशिस्त चालकांना पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिला. दिवाळीच्या काळात आठवडाभरात ४३६४ वाहनचालकांवर कारवाई करून ३६ लाख १४ हजार ४५० रुपयांचा दंड आकारला.

कोरोना महामारीनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीला पसंती दिली. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या काळात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीत बदल केला हाेता. मात्र, तरीही बेशिस्त वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले.

खरेदीसाठी आले विनाहेल्मेट

दिवाळी खरेदीसाठी गर्दी असल्याने अनेकांनी चारचाकी ऐवजी दुचाकीवरून बाजारपेठे गाठली. मात्र, यातील बहुतांश दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्याचे दिसून आले. अशा विना हेल्मेट असलेल्या ४०६ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

सीटबेल्टचा कंटाळा केला अन् घोटाळा झाला

चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावण्याबाबत उदासीन असलेल्या चालकांवर देखील पोलिसांनी कारवाई केली. अशा ३२७ जणांना ६५ हजार ४०० रुपयांचा दंड आकारला.

वर्दळीतही दामटली वाहने

दिवाळीनिमित्त सर्वच रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ होती. या वर्दळीतूनही काही चालकांनी त्यांची वाहने दामटली. अशा अतिवेगातील २६७ वाहनांवर ‘ओव्हर स्पीड’ अंतर्गत ५ लाख ३३ हजार रुपयांचा दंड आकारला.

बसवरही उगारला बडगा

काही बेशिस्त चालकांनी त्यांच्याकडील बस चालवताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले. अशा बसवर देखील पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिवाळीच्या काळात कारवाई केली. तसेच रिक्षाचालकांनाही कारवाईचा दणका दिला.

वाहतूक पोलिसांची दिवाळी रस्त्यावर

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी दिवाळीच्या काळात बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे, मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक नियमन केले. त्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले होते. या वाहतूक पोलिसांना ऐन सणासुदीत वाहतूक नियमन करावे लागले. त्यांना रस्त्यावरच त्यांची दिवाळी साजरी करावी लागली.  
 वाहतूक पोलिसांनी दिवाळीत २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान केलेली कारवाई

कारवाई - केसेस - दंड (रुपयांमध्ये)
विनाहेल्मेट - ४०६ - २०३०००
विनासीटबेल्ट - ३२७ - ६५४००
काळी काच - १२० - १०३०००
फॅन्सी नंबर प्लेट - २ - २०००
सिग्नल जम्मिंग - २३१ - १३२५००
मोबाईल टाॅकिंग - ११५ - १५४०००
रिक्षा - २४५ - १७०८००
ओव्हर स्पीड - २६७ - ५३३०००
बस - १३१ - ८५७५०

दिवाळीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. काही ठिकाणी वाहतुकीत बदल केला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.

- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड 

Web Title: In the city of Pimpri-Chinchwad, reckless drivers also get such a bonus traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.