ड्रग तस्कर गेला त्या हॉटेलात पोलिसही दिसला फुटेजमध्ये, चर्चांना उधाण; ...तेथे पोलिस कर्मचारी कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:13 AM2023-10-12T09:13:22+5:302023-10-12T09:13:41+5:30
पोलिसांनी हॉटेलचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ललितपाठोपाठ काही मिनिटांनी संबंधित पोलिस कर्मचारीदेखील त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
नितीश गोवंडे
पुणे : ललित पाटील या ड्रगतस्कराने २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ससून रुग्णालयातून पळ काढला. तेथून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो गेल्याचे सीटीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ललितपाठोपाठ काही मिनिटांनी संबंधित पोलिस कर्मचारीदेखील त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
ललित पाटील याने पोलिस गार्डला धक्का मारून ससून रुग्णालयातून पलायन केले होते, तर संबंधित पोलिस कर्मचारी नेमका त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये कसा पोहोचला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित आणि ललित पाटील पलायन प्रकरणात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.
चौकशी होणे गरजेचे
- ललितला अनेक महिन्यांपासून कोणत्या आजाराने ग्रासला होता. त्याच्यावर कोणता उपचार सुरू होता हा प्रश्न आहे.
- यासाठी अधिष्ठातांसह, डॉक्टरांची चौकशी होणे गरजेचे आहे.
‘कैदी ॲडमिट करा’
आजार असाे किंवा नसाे; आमचा कैदी पेशंट ॲडमिट करून घ्या, असे राजकीय व्यक्तींकडून डाॅक्टरांना निरोप येत आहेत. ॲडमिट केल्यानंतर आम्हालाच टीकेचे धनी व्हावे लागते. ताेंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावा लागतो, असे येथील डॉक्टर सांगतात.
‘डॉक्टरांना सहआरोपी करा’
- प्रमुख आरोपी ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सहआरोपी करा, अशी मागणी आ. रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.
- तो आजारी असल्याचा बहाणा करून ससूनमध्ये आल्यावर सहा डॉक्टर उपचार करीत होते. त्यात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेही होते.
तो देशाबाहेर गेला?
ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण, त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना गुन्हे शाखेने नेपाळ सीमेजवळून सोमवारी ताब्यात घेतले. त्यामुळे ललित नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
न्यायालयाने पोलिसांना खडसावले
‘इतके दिवस ललित पाटील ताब्यात होता, त्याला जे आहे ते सांभाळता आले नाही आणि आता भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या आरोपींसाठी पोलिस कोठडी मागताय? पोलिस खात्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याने पोलिस कोठडी मागताय का, असे कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना सुनावले.
अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायाधीशांनी नवीन कायदा आलाय माहितीये ना? एकाच वेळी चौदा दिवसांची पोलिस कोठडी घेणे योग्य होणार नाही, असे सांगितले.