हाफ मर्डरच्या चौकशीत दुसराही मर्डर उघडकीस! एकाच दिवशी दोघांचा गळा कापणाऱ्याला अटक
By विवेक भुसे | Published: March 3, 2024 05:41 PM2024-03-03T17:41:24+5:302024-03-03T17:41:39+5:30
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने एकाच दिवशी दोन खून केल्याची कबुली दिली
पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन धारदार हत्याराने वार करुन तरुणाच्या गळावर वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्यास हडपसर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने एकाच दिवशी दोघांच्या गळ्यावर वार केल्याचे व त्यात एकाचा मृत्यु झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
शुभम काकासाहेब निचळ (वय २५, रा. होळकरवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात खूनाचा तर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी भाऊसाहेब सुभाष काळे (वय ४१, रा. साईप्रभा सोसायटी, शिवणे, वारजे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादी यांचा भाऊ राहुल काळे (वय ३८) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १ मार्च रोजी रात्री दहा वाजता मगरपट्टा सिटी येथील कॉसमोस सोसायटीखाली झाली होती.
आरोपी आणि फिर्यादी यांचा भाऊ राहुल काळे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. ज्यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. जुन्या भांडणाच्या कारणावरुन शुभम याने राहुल याच्या गळ्यावर वार करुन गंभीर जखमी करुन तो पळून गेला. हडपसर पोलीस आरोपीचा शोध घेत असताना तो हांडेवाडी येथे सापडला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने या घटनेच्या अगोदर खराडी येथे आणखी एकावर वार करुन त्याचा खून केल्याचे सांगितले. चंदननगर पोलीसही त्याचा शोध घेतल्याचे समोर आले. बाळु ऊर्फ बाळकृष्ण धनाजी कांबळे (वय ३३, रा. थिटे वस्ती, खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना खराडी येथील रिव्हरडेल सोसायटीजवळ १ मार्च रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान घडली होती. शुभम निचळ आणि बाळु कांबळे हे पूर्वी एकाच ठिकाणी कामाला होते. तेथे त्यांचा पूर्वी वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरुन त्याने बाळु याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करुन तो पळून हडपसरला गेला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) पंडीत रेजितवाड यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत जेजितवाड, अमित साखरे, कुंडलीक, केसकर, रामदास जाधव या पथकाने ही कामगिरी केली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.