गेल्या दोन अधिवेशनांत पंतप्रधान मोदी राज्यसभेत तासभरही आलेले नाही, शरद पवारांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:33 PM2023-11-14T20:33:52+5:302023-11-14T20:34:29+5:30
संसदेची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे की काय, असे वातावरण राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहे ,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली.
बारामती - मी राज्यसभेत खासदार आहे, गेल्या दोन अधिवेशनात पंतप्रधान राज्यसभेत तासभरही आलेले नाहीत, अर्थमंत्र्यांनी विविध विषयांसंदर्भात खासदारांना विश्वासात घेऊन, चर्चा करुन, त्यातून प्रश्न सोडवायचे असतात, याचा विसरच सध्याच्या सरकारला पडला आहे. संसदेची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे की काय, असे वातावरण राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहे ,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली.
बारामती शहरातील महावीर भवन येथे दिवाळी पाडव्यानिमित्त मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, व्यापारी, उत्पादक यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवायला हवा, दुर्देवाने असा सुसंवाद करण्याची पध्दतच सरकारने बंद केलेली दिसते. केवळ माझीच नाही तर संसदेतील अनेक खासदारांचीही पंतप्रधान व अर्थमंत्री चर्चाच करत नाही अशीच भूमिका आहे.
सहकारी मंत्र्यांच्या खात्यात अजिबात हस्तक्षेपच करायचा नाही अशी पंतप्रधानांची भूमिका दिसते, ते एका अर्थाने चांगलेही आहे. पण प्रश्न सोडविण्यासाठी नंबर एकच्या व्यक्तीने प्रसंगी हस्तक्षेप करायला हवा, तसे होताना दिसत नाही.
देशातील उत्पादक, व्यापारी यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा पंतप्रधान, अर्थमंत्री व कृषीमंत्री यांचा सकारात्मक दृष्टीकोन नाही, प्रश्नांवर चर्चाच करायची नाही, अशी या सरकारची भूमिका आहे, सुसंवादच संपल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे पवार यांनी नमूद केले.
निवडणूकीच्या निमित्ताने एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी राज्य खाल्ले अशी टीका केली. मी इंदिरा गांधी यांच्यासह अनेक पंतप्रधानांचे कामकाज जवळून पाहिले आहे, पंतप्रधानांकडून जर असे आरोप या भाषेत व्हायला लागले तर लोकांनीच आता याचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले. एखाद्या राज्याच्या प्रमुखाची अप्रतिष्ठा होईल असे शब्द पंतप्रधानांनी वापरणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. लोकशाही जपायची असेल तर काही पथ्ये व मर्यादा पाळायला हव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
या सरकारने चर्चेची दारे बंद केल्याचे वातावरण आहे. महत्वाची धोरणे निश्चित करताना निर्णय घेताना व्यापारी, उत्पादक यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. चर्चेची दारे बंद झाल्याची किंमत व्यापारी व उत्पादकांना मोजावी लागत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. प्रश्न ऐकून घेत सोडविण्याचा राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा, दुर्देवाने ही प्रथाच बंद झाली आहे.
सुसंवाद बंद करणाऱ्या सरकारबद्दल लोकांनीच आता फेरविचार करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. यावेळी वालचंद संचेती, राजेंद्र गुगळे, संभाजी किर्वे, जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव, पौर्णिमा तावरे, सुशील सोमाणी, सचिन सातव, सुनील पवार आदी उपस्थित होते.