Pune | नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला ६ कोटींना गंडा; शंभरहून अधिक लोकांच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:42 PM2023-02-01T12:42:03+5:302023-02-01T12:43:30+5:30
जवळपास १०० जणांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत...
पुणे : तांदुळ स्वत:कडे खेचून घेणारे धातूचे भांडे असून त्याचे परिक्षण नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था करणार आहे. त्यांच्या प्रतिनिधींना भारतात आणून त्यांचे संशोधनाच्या अहवालासाठी मोठा खर्च येतो, या धातूच्या भांड्याच्या विक्रीतून मोठा फायदा मिळू शकतो,असे सांगून सर्वसामान्यांना गंडविण्याचा प्रकार पुण्यातही सुरु असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी जवळपास १०० जणांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. राईस पुलर या नावाने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत़.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले़ त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला. त्यानंतर या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले. गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. यात आतापर्यंत १००हून अधिक लोकांचे तक्रार अर्ज आले असून ही रक्कम ५ ते ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रुईकर यांनी सांगितले.