पवना कृषक संस्थेत भाजपची राष्ट्रवादीवर मात;भाजपने नऊ जागांवर मिळविला विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:00 IST2025-04-09T10:59:45+5:302025-04-09T11:00:27+5:30
पवना कृषक निवडणुकीत तालुक्यातील बड्या नेत्यांनी विविध प्रकारचे डाव खेळत सर्व उमेदवार रिंगणात उतरवले.

पवना कृषक संस्थेत भाजपची राष्ट्रवादीवर मात;भाजपने नऊ जागांवर मिळविला विजय
पवनानगर : मावळ तालुक्यातील बहुर्चित ‘पवना कृषक सहकारी संस्थे’ची निवडणूक सोमवारी (दि.७ एप्रिल) पार पडली. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांनी आमनेसामने येऊन निवडणूक लढवली होती. निवडणुकीत भाजपाने ९ जागांवर विजय मिळवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला. राष्ट्रवादीला केवळ ४ जागावर समाधान मानावे लागले.
तालुक्यातील मोठ्या राजकीय नेते मंडळींनी पवना कृषिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कंबर कसली होती. एकूण १३ जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. तर सर्वसाधारण गटातील ८ जागेसाठी २१ उमेदवार रिंगणात उतरले होते. तसेच महिला प्रतिनिधीच्या २ जागेसाठी ४ तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते. इतर मागास प्रवर्ग १ जागेसाठी ३ उमेदवार आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास वर्ग १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते.
मतदार संघ व विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते
सर्वसाधारण गटातील ९ जागा
१)भाऊ सतू सावंत - १०९
२)अनिल भागू तुपे -१०४
३)धोंडू शिवराम कालेकर - १०२
४)बबन अर्जुन दहिभाते - ९७
५)गणपत गोविंद घारे - ८९
६)अंकुश तातेराम पडवळ - ८९
७)किसन विष्णू घरदाळे -८६
८)राम बारकू नढे - ८५
महिला प्रतिनिधी २ जागा
१)लक्ष्मीबाई किसन आडकर - ११७
२)सुशीला रामदास घरदाळे- १०८
अनुसूचित जाती जमाती १ जागा
१)अंकुश ज्ञानदेव सोनवणे - १२७
इतर मागासवर्ग १ जागा
१)शेखर मारुती दळवी - ११९
भटक्या विमुक्त जाती - जमाती विशेष मागास वर्ग १ जागा
१)बाळू चिंधू आखाडे - ११५
नेत्यांना मतदारांनी नाकारले
पवना कृषक निवडणुकीत तालुक्यातील बड्या नेत्यांनी विविध प्रकारचे डाव खेळत सर्व उमेदवार रिंगणात उतरवले. पंरतु महिनाभर चालू असलेल्या निवडणुकीत अनेक डावपेच काढून देखील निवडणूक बिनविरोध करण्यात सर्व नेत्यांना अपयश आले. मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक बिनविरोध झाल्याचे नेते मंडळीनी जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी दुपारी साडेतीनच्या आसपास एक गट मतदान केंद्रावर दाखल झाला व मतदान करण्यासाठी गेले. मतदान केंद्रावर अचानक गर्दी झाल्याने अनेक मतदार मतदानाचा हक्क बजविण्यासाठी आले. यावेळी सर्व उमेदवार व नेत्याची धावपळ झाल्याचे दिसून आले. यामुळे बिनविरोधची घोषणा फक्त घोषणाच राहिली.
निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली धांदल
मतदान संध्याकाळी ६ वाजता संपल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रक्रियेमध्ये होते.पंरतु एका गटाने दावा करत मतमोजणी आता नका करु उद्या करण्याची विनंती केली. पंरतु एका गटाने आताच मतमोजणी करण्याचा आग्रह धरल्याने दोन तासांच्या गोंधळानंतर मतमोजणी सुरुवात केली व रात्री साडे अकराच्या दरम्यान मतमोजणी पूर्ण झाल्याचे निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी जाहीर केले.